नागपर : मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांनी स्वत: विरोधी पक्षातील नेत्यांना निमंत्रण दिले होते. परंतु या सोहळ्याला महाविकास आघाडी तसेच काँग्रेसच्या नेत्यांपैकी कोणीही हजर नव्हते.
या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, चित्रपट अभिनेते, क्रीडा, व्यापार, उद्योग व्यवसायातील तसेच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री कृषी शिवराजसिंह चौहान तसेच मोदींच्या मंत्रिंडळातील बहुतांश मंत्री उपस्थित होते. तसेच एनडीएचे नेते व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हजेरी लावली होती. उद्योजक मुकेश आणि अनिल अंबानी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, चित्रपट अभिनेते आमीर खान, शाहरूख खान, सलमान खान, रणबीरसिंग, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित या शपथविधी सोहळ्यात होते. मात्र, विरोधी पक्षाचे आमदार, खासदार माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री यापैकी कोणीही नव्हते.
हेही वाचा – सोन्याच्या दरात घट, चांदीने वाढवली चिंता… हे आहेत आजचे दर…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, मनसचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण दिले असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमाला हजर राहू शकत नसल्याचे कळवले होते. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी शपथविधीला न जाण्याचे कारण नागपुरात शुक्रवारी पत्रकार परिषद बोलताना स्पष्ट केले आहे. पटोले म्हणाले, आपल्याला शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. निमंत्रण मिळाले असते तर शपथविधीला गेलो असतो.
हेही वाचा – वर्धा : नौदलाची कॅप प्राप्त होताच आईच्या डोक्यावर चढवून केला कडक सॅल्युट
महायुतीच्या नेत्यांनी कोणा-कोणाला निमंत्रण दिले माहिती नाही. मला निमंत्रण नव्हते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यांना शुभेच्छा आहेत. महाराष्ट्र पुढे जावे. येथील युवकांना रोजगार मिळायला हवा. आता आमचे मित्र मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी राज्यात कंत्राटी भरती केली जाणार नाही, असे म्हटले होते. आता त्यांनी कंत्राटी भरती करू नये. राज्यात दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. ती पदे भरून युवकांना न्याय द्यावे. कापूस, सोयाबीनाला भाव मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे.