लोकसत्ता टीम
गोंदिया : आमच्या गोंदिया, भंडारा जिल्ह्यात एक स्वनाम धन्य नेते आहेत त्यांना दुसऱ्या कुणा नेत्याचे वाढते राजकीय प्रस्थ अजिबात बघवत नाही इतर कुणी जर राजकीयदृष्ट्या वाढू लागला तर त्याचे पंख छाटण्याचे काम हे नेते करता त्याचा अनुभव माझ्यापासून तर इतरही अनेक नेत्यांनी घेतला आहे, असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत खासदार प्रफुल्ल पटेल यांचा नाव न घेता केले. सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेवर असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.
यासंदर्भातच पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, या नेत्यांनी काँग्रेसमध्ये गोंदिया भंडारा जिल्ह्यात माझे प्रस्थ वाढत असताना मला राजकीय दृष्ट्या संपवण्याच्या प्रयत्न केला.त्यामुळे माझ्यावर भाजपवासी होण्याची वेळ आली होती. आणि पुढे त्यांच्यामुळेच ही वेळ गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावरही आली होती त्यामुळे ते पण गेले पाच वर्ष भाजपात काढून आज काँग्रेस पक्षात परत आले.
आणखी वाचा-सख्खा भाऊ झाला पक्का वैरी… अमोल देशमुख म्हणाले, आशीष देशमुखांची मानसिकताच….
गोंदिया, भंडारा जिल्ह्यात त्या नेत्यांनी त्रास दिलेले अनेक नेते आहेत त्यापैकीच एक आज मंचावर उपस्थित असलेले गोंदिया जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि अर्जुनी मोरगावचे उमेदवार दिलीप बनसोड सुद्धा आहेत. कधीकाळी दिलीप बनसोड हे तिरोड्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते आणि आपल्या बळावर तिरोडा त्यांनी काबीज केला होता. पण दिलीप बनसोड यांचेही वाढते राजकीय प्रस्थ त्यांना बघवत नसल्यामुळे अखेर त्यांनी पण आपली वेगळी वाट धरत माझ्या सानिध्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आज त्यांना मी गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे अध्यक्षपद दिले आणि अर्जुनी मोरगाव येथून काँग्रेसची उमेदवारी सुद्धा दिलेली आहे.
आणखी वाचा-निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
हेच नेते आज गोंदिया, भंडारा जिल्ह्यात प्रचारातून काँग्रेसला हद्दपार करण्याची घोषणा करत सुटले आहेत पण मी तुम्हाला हमी देतो की ते यात ते अपयशी होणार असून मीच महाराष्ट्राला भाजप मुक्त करणार असल्याची घोषणा नाना पटोले यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या समक्ष केली.