नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेते तयार व्हावे यासाठी प्रयत्न केला जाईल. महाविकास आघाडीमध्ये एकत्र निवडणुका लढल्या गेल्या तरी आम्ही मागून वार करणार नाही. स्वबळावर लढायचे ठरले तर ते सांगून करणार, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
पटोले नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, गेले दोन दिवस लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बैठकीतून आढावा घेतला. यामधून निष्कर्षांला जाणार आहोत. फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार की स्वबळावर लढणार याबाबतचा निर्णय झाला नसला तरी तयारी सुरू केली असल्याचे पटोले यांनी सांगितले. कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. आमची भूमिका स्पष्ट आहे. विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. माझ्या नावाने जर भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावले असेल तर या पद्धतीचे पोस्टर लावू नये, असे कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो.
जनगणनेबाबत सरकारने निर्णय घ्यावा..
राज्यातील ओबीसी दुर्लक्षित असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिबीर घेतले जात असेल तर ते चांगले आहे. राजकीय जीवनात मी ओबीसींचे प्रश्न मांडले आहेत. विधानसभा अध्यक्ष असताना जनगणनेसाठी ठराव मांडला होता. कर्नाटक निवडणुकीत जातीनिहाय जनगणना केली पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. सर्वच पक्ष ओबीसीसाठी काम करत असताना जनगणनेबाबत सरकारने निर्णय घ्यावा. शिवसेनेचे संजय राऊत यांच्या वक्तव्याकडे फारसे गंभीरपणे मी आता पाहात नाही. त्यांची थुंकण्याबाबतची प्रतिक्रिया योग्य नाही, मात्र आम्हाला राऊतांवर बोलायचे नाही, असेही पटोले म्हणाले.