चंद्रपूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर सातत्याने माझा अपमान करित असले तरी संविधान वाचविण्यासाठी व मतविभाजन टाळण्यासाठी दोन जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र या प्रस्तावावर ॲड.आंबेडकर यांच्याकडून अजूनही उत्तर आलेले नाही अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे दिली. इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येथे आले असता पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली.
आम्हाला मतविभाजन नको आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान वाचविण्याची आज गरज आहे. त्यामुळेच आम्ही वारंवार ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडे प्रस्ताव देत आहे. मात्र ॲड.आंबेडकर यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळत नसल्याचेही पटोले म्हणाले. अकोलाचे काँग्रेसचे उमेदवार डॉ.अभय पाटील यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. तेव्हा मी अकोला येथे उपस्थित होतो. तेव्हाही आम्ही ॲड.आंबेडकर यांना प्रस्ताव दिला. त्यानंतर अमरावती येथे काँग्रेस उमेदवाराने नामनिर्देशन दाखल केले तेव्हाही तिथे असतांना वंचितला प्रस्ताव दिलेला आहे.
हेही वाचा…यवतमाळात वंचितला धक्का! उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने निवडणुकीपासून राहणार ‘वंचित’
वंचितच्या नेत्यांकडून वारंवार अपमान होत असतांनाही आम्ही वंचितला सोबत घेण्यास तयार आहे. त्याला कारण आम्हाला मतविभाजन नको आहे तसेच देशाचे संविधान वाचविणे हा प्रमुख उद्देश आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना माझी विनंती आहे, अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही प्रस्ताव द्या, काँग्रेसच्या कोट्यातून दोन जागा वाढवून देवू. मात्र अजूनही वंचितने उत्तर दिले नसल्याची माहिती पटोले यांनी दिली.