लोकसत्ता टीम

नागपूर : आम्ही हरलो की जिंकलो हा प्रश्न नाही. आम्ही जनतेसाठी काम करू. निवडणूक निकाल लागून पाच दिवस झाले तरी सरकार अस्तित्वात आले नाही. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाही, महागाई वाढली आहे. जनतेची काही चिंता नाही. आम्ही न्यायालयीन लढाई लढू, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू, जनभावनेची लढाई लढू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

निवडणूक आयोगाने लोकशाही टिकवण्यासाठी काम करायला हवे. आम्ही आयोगाला मतदान कसे वाढले, कोणत्या मतदान केंद्रावर वाढले, याबाबत विचारणा केली आहे. मात्र, मतदान वाढले असे एक्सवर (ट्विट) सांगते, पण हे मतदान कसे वाढले, याचा खुलासा करत नाही. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. आम्हाला कोणी हरवू शकत नाही, अशा गुर्मीत भाजप आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे.

आणखी वाचा-पाळणा सजवला, ओटी भरली… गाईच्या डोहाळे जेवणात पंगत घालून…

बंटी शेळके यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता ते म्हणाले, तो पक्ष संघटनेच्या पातळीवरील विषय आहे. त्यावर औषधोपचार करू. त्यावर नंतर बोलणार आहे. पण, सध्यातरी राज्यसमोर निवडणूक प्रक्रियेसंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मी लोकशाही वाचवण्यासाठी काम करत आहे. लोकशाही वाचेल तर देश वाचेल. झारखंडमध्ये मते वाढली पण ती केवळ दीड टक्के आहेत. महाराष्ट्रात मात्र, तब्बल ७.६ टक्के टक्के मतदान वाढले. एवढ्या लांब रांगा कोणत्या मतदान केंद्रावर होत्या? निवडणूक आयोग बुथवर ताबा मिळवत आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आणखी वाचा-एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ झाली कशी? काँग्रेसने थेट निवडणूक आयोगालाच…

गेल्या पाच दिवसांपासून सरकार बनले नाही. लोकांच्या मतांनी सरकार आले असते तर काळजी असती नसती. हे सरकार निवडणूक आयोगाचा कृपेने आले. राज्यात अनेक प्रश्न आहेत, पण जनतेची भीती नसल्यानेसारखे हे भाजपचे लोक वागत आहेत. माझे स्पष्ट मत आहे की, निवडणूक आयोग अप्रामाणिक आहे. माझ्या भूमिकेला राज्यातील ८५ ते ९० टक्के लोकांनी समर्थन दिले आहे. हा विषय माध्यमांनी मांडायला हवा. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. ते आपल्या मूळगावी गेले आहेत. या प्रश्नांना काही अर्थ नाही. शिंदे यांच्या नाराजीबाबत आम्हाला काही देणे घेणे नाही. मुळात हे सरकार जनतेच्या मतांवर नव्हेतर ईव्हीएममुळे आले आहे. त्यांच्याबद्दल सहानूभूती असण्याचे काहीच कारण नाही, असेही पटोले म्हणाले.