नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ई-मेल करून पदमुक्त करण्याची विनंती केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी पक्षाकडे ही विनंती केली आहे. पटोले यांनी चार वर्षांपासून आपण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहे. आता पदमुक्त करण्यात यावे, अशी विनंती करणारा ई-मेल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पाठवला आहे. या वृत्ताला प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुले लोंढे यांनी दुजोरा दिला आहे.

विधान निवडणुकीचे निकाल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. परंतु त्यांनी ती फेटाळली होती. त्यांनी दिल्लीत जावून पक्षश्रेष्ठींची भेट २४ नोव्हेंबरला घेतली होती. त्यांना पक्षश्रेष्ठींकडून अभय मिळाले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी ई-मेल द्वारे पदमुक्त करण्याची विनंती केली. परंतु राजीनामा दिलेला नाही, असा दावा करण्यात येत आहे. 

हेही वाचा >>>नागपूर: विद्यापीठाच्या ३६ परीक्षा पुढे ढकलल्या, कधी होणार बघा

 महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी केवळ १६ जागा काँग्रेसला मिळाल्या. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे या सारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला आहे. ते स्वत: देखील अत्यल्प मतांनी विजयी झाले. त्यामुळे नाना पटोले यांच्यावर पक्षातून टीका होऊ लागली. यासर्वाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. परंतु त्यांनी राजीनामा दिला नाही. आता अचानक ई-मेलद्वारे पदमुक्त करण्याची विनंती करून पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींवर निर्णय सोपवला आहे.

हेही वाचा >>>अमरावती : प्रधानमंत्री किसान सन्‍मान योजना आता बाह्ययंत्रणेकडून! काय होणार परिणाम…

पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विधानसभा निवडणुकीतील सर्वात मोठा पराभव झाला. यापूर्वी त्यांच्या काळात काँग्रेसने काही स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकात विजय मिळवला. तसेच पदवीधर, शिक्षण मतदारसंघातही चांगली कामगिरी केली. त्याचा सर्वोत्तम बिंदू म्हणजे लोकसभेत घवघवशीत मिळाले. त्यामुळे पटोले यांची प्रसंशा झाली. त्यांचे पक्षातील विरोधक देखील शांत होते. पण, आता पक्षातील विरोधक सक्रिय झाले आहेत. पक्षातून त्यांच्या नेतृत्व गुणांविषयी आणि कार्य पद्धतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले आहे. त्यामुळे पटोले यांच्यावर पद सोडण्याचा दबाब निर्माण झाला आहे. मात्र, त्यांनी राजीनामा न देता पक्षश्रेष्ठींवर त्याबाबतचा निर्णय सोडून दिला आहे.

यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पटोले यांनी पदमुक्त करण्याचा ई-मेल केल्याचे सांगितले. तसेच हा राजीनामा नसल्याचेही स्पष्ट केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole requests mallikarjun kharge to be relieved of his post nagpur news rbt 74 amy