लोकसत्ता टीम
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किरेन रिजिजू यांना केंद्रीय कायदे मंत्रीपदावरून दूर केले आहे. त्यांना तुलनेने कमी महत्वाचे खाते दिले आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील अर्जून राम मेघवाल यांना कायदेमंत्री बनवण्यात आले आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पटोले म्हणाले, मोदींचे मंत्रिमंडळ पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) चालवत असते. सर्व निर्णय पीएमओमध्ये होतात. मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना विचारल्यास ते त्यांना किती अधिकार आहेत, याबाबत चांगले सांगू शकतील.
रिजिजू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कोलॅजियम पद्धतीवर टीका केली होती. त्यानंतर ते चर्चेत आले होते. तसेच त्यांनी सरकारचे अधिकार, न्यायालयाचे अधिकार आणि राज्यघटना याबाबत अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यांच्या वक्तव्यामुळे केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायलयात तणाव निर्माण झाल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने त्यांचे खाते बदलण्याचा निर्णय घेतला आहे.