नांदेड: प्रस्तावित महसूल आयुक्तालय नांदेडला स्थापन झाले पाहिजे, ही मागणी महाविकास आघाडीतील पक्ष आणि हितचिंतकांच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्याची तयारी व चर्चा येथे सुरू झालेली असताना सर्व संबंधितांना सोडून देत, नांदेडचे काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण एकटेच महसूलमंत्र्यांना भेटल्याची माहिती बुधवारी समोर आली.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मागील महिन्यातील नांदेडच्या दोन दौर्‍यांमध्ये आयुक्तालय स्थापनेचा प्रलंबित विषय चर्चेमध्ये आल्यानंतर शेजारच्या लातूरमध्ये लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी उचल खात आयुक्तालय लातूरला झाले पाहिजे, अशी मागणी पुढे रेटली; पण या बाबतीत नांदेडमध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये उदासिनता दिसत होती.

जानेवारी २००९ साली महसूल आयुक्तालय नांदेडला स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला होता. या विषयात आधी आणि नंतरही सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि विकासप्रेमी सामाजिक कार्यकर्ते एकत्रपणे कार्यरत होते. एक कृति समितीही स्थापन झाली होती आणि या समितीनेच सन १९९९ पासून वेळोवेळी शासनाकडे आपले म्हणणे मांडले.

आयुक्तालय नांदेडमध्ये स्थापन करण्याचा तत्कालीन सरकारचा निर्णय न्यायालयीन कसोटीला उतरलेला असतानाही लातूरच्या दबावामुळे २०१५ नंतर कोणत्याही सरकारने त्यात हात घातला नाही. आता काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून या विषयाला तोंड फोडण्यासाठी सामूहिक कृतीची गरज असताना खा.चव्हाण एकटेच मुंबईला गेले आणि महसूलमंत्र्यांना भेटून आल्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी येथे आश्चर्य व्यक्त केले.

राज्यात महायुतीचे सरकार असून नांदेड जिल्ह्यातील सर्वच आमदार युतीतील पक्षांचे असले, तरी आयुक्तालयाचा विषय त्यांनी आपल्या अजेंड्यावर घेतलेला नाही. आघाडीतील काँग्रेस व मित्रपक्षांकडे प्रभाव पाडणारे काही माजी मंत्री अजूनही सक्रिय आहेत. या सर्वांना एकत्र आणून आयुक्तालयप्रश्नी अधिवेशन काळात मुंबईत धडकण्याची चर्चा सुरू झाली होती. पण खासदारांची एकला चलोरे भूमिका पाहून काँग्रेस पक्षातले काही पदाधिकारी अवाक् झाले.

मुंबईला गेलो, म्हणून भेटून आलो

महसूलमंत्र्यांना खासदार एकटेच भेटल्यामुळे सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांच्याशी भेट संपर्क साधला असता, मुंबईला गेलो म्हणून त्यांना भेटलो असे सांगून आयुक्तालयाच्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी संबंधितांचे शिष्टमंडळ घेऊन जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी नांदेडमध्ये स्पष्ट केले.

Story img Loader