गडचिरोली : बैल पोळ्यानिमित्त सर्वत्र उत्साह असून शहरातील बाजारपेठ विविध आकाराच्या लाकडी नंदीबैलांनी फुलली आहे. यात ७० हजारांची बैलजोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत असून जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. यातील एक बैल ४० तर दुसरा ३० हजारांचा आहे.
वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी पोळा हा सण साजरा केला जातो. प्रामुख्याने विदर्भात दुसऱ्या दिवशी बालगोपाळ लाकडी नंदीबैल फिरवून तान्हापोळा साजरा करतात. याकरिता शहरात विविध आकार व रंगाचे लाकडी नंदीबैल विक्रीकरीता आले आहे. आकर्षक नक्षीकाम केलेली बैलजोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यातील ४० व ३० हजाराचे नंदीबैल चर्चेचा विषय ठरले आहे. गोकुळनगरमधील राहुल कोसरे यांनी हे नंदीबैल साकारले आहे. परंतु यांची किमंत ऐकूणच अनेकांना तोंडात बोट घालण्याची वेळ येत आहे. तरीही या सुरेख कलाकृतीला बघण्यासाठी नागरिक गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.