नागपूर : चौकात वाहतूक पोलीस कर्मचारी उभे असल्यानंतर वाहनचालक वाहतुकीचे नियम तोडण्याची हिंमत करीत नव्हते. मात्र, आता वाहतूक पोलिसांचा वचक संपला असून कारवाईची पर्वा न करता बिनधास्त नियमांचे उल्लंघन करीत आहेत. नागपूरकर वाहतूक नियमांविषयी बेफिकीर असून गेल्या वर्षभरात शहरातील तब्बल ८ लाख ९२ हजार दुचाकीचालकांवर हेल्मेटची कारवाई करण्यात आली आहे. अजूनही शहरात हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.
रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढले
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्थाही बिघडली आहे. सध्या युवावर्गात वाहतुकीचे नियम तोडण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे सामाजिक सुरक्षिततेची नवी समस्या निर्माण होत आहे. सिग्नल तोडून प्रचंड गर्दीतही अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांना आपल्या या अतिआत्मविश्वासामुळे अपघात होण्याची भीती नाही. गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हेल्मेट सक्ती केल्यापासून अनेक सुजाण वाहनचालकांनी हेल्मेट वापरणे सुरू केले होते. मात्र, वाहतूक पोलिसांनी चिरीमिरी घेण्याचा सपाटा सुरू केल्यामुळे सद्यस्थितीत अनेक जण विनाहेल्मेट दुचाकी चालवताना दिसतात.
२०२४ मध्ये जवळपास ९ लाख वाहनचालकांवर कारवाई
वर्ष २०२३ मध्ये ६ लाख ४२ हजार ६५५ दुचाकीचालकांवर हेल्मेट न वापरल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्यामुळे पुढच्या वर्षी दंडात्मक कारवाईची आकडेवारी कमी व्हायला हवी होती. मात्र, याउलट २०२४ मध्ये हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या वाढली. गेल्यावर्षी ८ लाख ९२ हजार ८०३ दुचाकीचालकांवर हेल्मेट न घातल्याने कारवाई करण्यात आली. म्हणजेच २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीचालकांची भर पडली आहे. त्यावरुन वाहतूक पोलिसांचा वचक कमी झाला आहे.
६४ हजार चालकांकडून ‘सिग्नल जम्पिंग’
शहरात जवळपास २३४ पेक्षा जास्त मुख्य चौकात वाहतूक दिवे कार्यरत आहेत. मात्र, सर्वच चौकात वाहतूक पोलीस ठेवणे शक्य नाही. त्याचाच गैरफायदा अनेक वाहनचालक घेतात. गेल्या वर्षभरात ६४ हजार ५१४ वाहनचालकांनी सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच प्रत्येक सिग्नलवर असलेली स्टॉप लाईनच्या पुढे वाहन नेल्याप्रकरणी पोलिसांनी १९ हजार ४२५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
वाहतूक विभागाचा उतारा
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमित कारवाई केल्या जाते. वाहतूक शाखेकडून लवकरच निःशुल्क हेल्मेट वितरण करण्यात येणार आहे, असे नागपूर वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त माधुरी बाविस्कर यांनी सांगितले.