अकोला : इंटरनेटच्या युगात सर्व व्यवहार सुलभ झाले आहेत. मात्र, वापरण्याच्या अपुऱ्या माहितीमुळे ते धोक्याचे देखील ठरू शकतात. सायबर गुन्हेगार याच उणीवांचा फायदा उचलन इतरांचे आर्थिक व सामाजिक नुकसान करतात. असाच एक प्रकार अकोला जिल्ह्यात उघडकीस आला आहे. कस्टम विभागाच्या नावावर महिलेची ऑनलाइन फसवणूक केली. या प्रकरणी अकोला पोलिसांनी सखोल तपास करून महिलेची ६.३४ लाखाची रक्कम परत मिळवून दिली.
जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी तक्रारदार आकांक्षा वालशिंगे नेहमी ऑनलाइन पद्धतीने खरेदी करत होत्या. एक दिवस त्यांना अनोळखी व्यक्तीने मोबाइलवर संपर्क साधला. ‘तुमच्या नावाचे विमानतळावर पार्सल प्राप्त झालेले आहे. ते पार्सल सोडवण्यासाठी आपल्याला शुल्क द्यावे लागतील. तसेच तुमचे पार्सल हे कस्टम विभागाने तपासले त्यामध्ये अंमली पदार्थ असल्याचे दिसत आहे. त्यानुसार तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे,’ असे सांगून बनावट एफ.आय.आर.ची कॉपी देखील पाठवली. तक्रारदार महिलेने फसवणूक करणाऱ्याने सांगितल्याप्रमाणे ऑनलाइन पध्दतीने टप्प्या-टप्प्याने विविध बँक खात्यात एकूण सहा लाख ३४ हजार रुपयांची रक्कम पाठवली. त्यानंतर तक्रारदार महिलेने त्या व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अकोट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. ही तक्रार अकोला सायबर पोलिसांकडे प्राप्त झाली. सायबर पोलिसांनी ऑनलाइन व्यवहाराची तात्काळ माहिती घेऊन संबंधित बँकेसोबत पत्रव्यवहार केले. रक्कम पाठवलेले खाते गोठविण्यात आले. त्यानुसा न्यायालयामार्फत सुपुर्दनाम्यावर फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम तक्रारदार महिलेला परत मिळवून दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय नाफडे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस अंमलदार गजानन केदारे, पोलीस अंमलदार अतुल अजने, पो.अंमलदार आशिष आमले, पो. अंमलदार कुंदन खराबे आदींनी केली.