शफी पठाण
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आज मंगळवारी वर्धा येथे पार पाडली. या बैठकीत ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध असलेले नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
विदर्भ साहित्य संघाचे या वर्षी शताब्दी वर्ष असल्यामुळे ९६ वे संमेलन विदर्भात व्हावे, अशी इच्छा महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने व्यक्त केली होती. त्या संमेलनासाठी त्यांनी वर्धा हे नाव संमेलनस्थळासाठी सुचवले होते. साहित्य महामंडळानेही त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत हे संमेलन वर्धेला दिले.
हेही वाचा >>> बुलढाणा: कृषिमंत्री अब्दुल सत्तार ‘बॅकफूट’वर; सिंदखेडराजाचा दौरा केला रद्द, संभाव्य संघर्षही टळला
वर्धा-सेवाग्राम-पवनार ही गांधी-विनोबांची कर्मभूमी आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या संमेलनासाठी गांधीविचारांवर लेखन करणाऱ्या लेखकाची अध्यक्ष म्हणून निवड व्हावी, असा एक मतप्रवाह आहे. त्यातूनच विदर्भ साहित्य संघाकडून जेष्ठ लेखक व विचारवंत सुरेश द्वादशीवारांचे नाव पुढे करण्यात आले होते. महामंडळाच्या इतर घटक संस्थांचेही द्वादशीवारांच्या नावाला समर्थन असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळेच बैठकीत द्वादशीवारांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता साहित्यवर्तुळात व्यक्त केली जात होती. परंतु, बैठकीच्या एक दिवसाआधी नावाचे गणित बदलले व ऐनवेळी चपळगावकर यांचे नाव पुढे करण्यात आले. चपळगावकर यांच्याशिवाय दुसरे नाव चर्चेलाच न आल्याने अखेर अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.