नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी नागपूरला येत आहेत. सकाळी नऊ वाजता नागपुरात आगमन झाल्यावर ते रेशीमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्मृतिमंदिर, दीक्षाभूमी, माधव नेत्रालय तसेच अमरावती मार्गावरील सोलार एक्सप्लोझिव्हला भेट देतील. यानिमित्त संघभेटीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. भारतरत्न आणि माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट देणारे पहिले पंतप्रधान आहेत. २७ ऑगस्ट २००० मध्ये वाजपेयी यांनी स्मृती मंदिराला भेट देत आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते.

संघाच्या मुशीत घडलेले अटल बिहारी वाजपेयी हे स्वतंत्र भारताच्या दुसऱ्या लोकसभेत भारतीय जनसंघाच्या निवडून आलेल्या चार खासदारांपैकी एक होते. वाजपेयी यांची जडनघडण संघाच्या मुशीत झाली होती. पंतप्रधान झाल्यावर त्यांची नाळ संघाशी जुळलेली होती. त्यामुळे १९९९ मध्ये स्थिर सरकार येताच आपल्या मंत्रिमंडळासह त्यांनी रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली होती. संघाच्या स्मृतीमंदिराला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्चला माधव नेत्रालयाच्या विस्तारीत इमारतीच्या भूमिपूजनासाठी नागपुरात येत असून यावेळी स्मृतीमंदिराला भेट देणारे दुसरे पंतप्रधान ठरतील. अटल बिहारी वाजपेयी यांनी तीनवेळा भारताचे पंतप्रधान पद भूषविले आहे.

ते पहिल्यांदा १९९६ मध्ये फक्त १३ दिवसांचे पंतप्रधान बनले होते. यानंतर ते १९९८ ते १९९९ पर्यंत १३ महिन्यांचे पंतप्रधान बनले. यानंतर १९९९ ते २००४ या काळात ते पुन्हा ५ वर्षांसाठी देशाचे पंतप्रधान राहिले होते. यादरम्यान २००० साली त्यांनी नागपूर येथे काही कार्यक्रमासाठी आले असता संघाच्या स्मृतीमंदिराला भेट दिली होती. यावेळी तत्कालीन मंत्री प्रमोद महाजन, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि अनेक नेते उपस्थित होते. विदर्भ प्रांत ससहसंघचालक डॉ. श्रीराम जोशी यांनी यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वागत केले होते. यानंतर त्यांनी दीक्षाभूमिलाही भेट दिली होती.