चंद्रपूर : आवारपुरातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये कंत्राटी व लोडर कामगारांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ एल अँड टी कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांची कंपनीच्या प्रवेशद्वारावर सभा झाली. दिवाळीचा बोनस नाकारणाऱ्या कंपनीला पुगलिया यांनी, हातात उभारी घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सज्जड दम देत दोन दिवसांत दिवाळीचा बोनस कामगारांच्या खात्यात जमा करा, असे आवाहन कंपनी प्रशासनाला केले.
कंपनीमध्ये कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत अल्ट्राटेक व्यवस्थापनाला जाग आणण्यासाठी मंगळवारी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पुगलिया यांची सभा पार पडली. अल्ट्राटेक कंपनीने बोनस देण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतल्याने कामगारांमध्ये असंतोष व नाराजीचे वातावरण होते. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या सोई-सुविधा बंद केल्या. त्यामुळे पुगलिया संतापले. कामगारांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. मखमलीरुपी वस्त्रांमध्ये लपेटून ठेवलेले सत्याग्रहाचे हत्यार मला उपसायला लावू नका, दंडुका चालवण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा त्यांनी कपंनी प्रशासनाला दिला. २२ नोव्हेंबरपर्यंत कंत्राटी कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कंपनीचा धूर बंद केल्याशिवाय राहणार नाही, याला कंपनी व्यवस्थापनच जबाबदार असेल, असेही पुगलिया यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – पूर्व विदर्भात डेंग्यूग्रस्तांची संख्या चारपट! नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण
यावेळी बल्लारपूर पेपर मिलचे तारासिंग कलसी, देवेंद्र गजानन गावंडे, देवेंद्र गलोत, अशोक नागापुरे, देवेंद्र बेले, अविनाश जाधव, अजय मानवटकर, उत्तम उपर, राम रतन पांडे, राजेश बेले, अंबुजा कामगार संघटनेचे पदाधिकारी, एसएससी सिमेंट कंपनी घुग्घुस कामगार संघ, कामगार संघटनेचे पदाधिकारी, नारडा कामगार संघटनेचे पदाधिकारी, अल्ट्राटेक कामगार संघटनेचे साईनाथ बुचे, शिवचंद्र काळे उपस्थित होते.