नागपूर : देशातील कुठल्याही राज्यात राज्यपालपद मिळवून देतो, असे आमिष दाखवणाऱ्या निरंजन सुरेश कुलकर्णी (४०, गंधर्व नगरी परिसर, नाशिक) या महाठगाने तामिळनाडूतील एका शास्त्रज्ञाची ५ कोटी ९ लाख रुपयांनी फसवणूक केली. त्यातील ३ कोटी रुपये नागपुरातील एका सेवाभावी संस्थेला गोशाळा उभारण्यासाठी दिले, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कुलकर्णीला नाशिक पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच अटक केली.
आरोपी निरंजन कुलकर्णी याची राजकीय नेत्यांशी ओळख आहे. त्याने यापूर्वी गो-रक्षेसाठी काम केले आहे. तो अनेकदा नेत्यांच्या बैठकीतही उपस्थित राहत होता. त्याची ओळख नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी (५६, थिरुवन्मीयूर, चेन्नई) या शास्त्रज्ञाशी झाली. आपले अनेक राजकीय नेत्यांशी संबंध आहेत, असे सांगून त्याने रेड्डी यांना देशातील कुठल्याही राज्यात राज्यपाल पद मिळवून देण्याचे आमिष दाखवले व त्यासाठी १५ कोटींची मागणी केली. रेड्डी यांनी कुलकर्णीला प्रथम ५ कोटी ९ लाख रुपये दिले. यातील ६० लाख त्याने रोख घेतले तर उर्वरित रक्कम स्वत:सह नातेवाईकाच्या बँक खात्यात टाकण्यास सांगितली. पैसे मिळाल्यानंतर त्याने थेट नागपूर गाठले. मिळालेल्या ५ कोटी ९ लाख रुपयांमधून नागपुरातील वैश्विक फाऊंडेशनला ३ कोटी रुपये दिले, अशी माहिती या प्रकरणाचे नाशिक येथील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मुद्गल यांनी दिली. त्या पैशातून गोशाळा बांधण्यात येणार होती. दरम्यान, रेड्डी यांना निरंजनवर शंका आली. त्यांनी पैशांची मागणी केली. परंतु, त्याने नकार देत ठार मारण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रेड्डी यांनी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक आंचल मुद्गल यांनी निरंजनला नाशिकमधून अटक केली.
हेही वाचा : महाराष्ट्रातून ओडिशात सोडलेली वाघीण झारखंडमध्ये
नाशिकचे पोलीस पथक नागपुरात
रेड्डी यांच्याकडून उकळलेल्या ५ कोटींच्या रकमेपैकी ३ कोटी रुपये नागपुरातील वैश्विक फाऊंडेशनला दिल्याची कबुली आरोपी कुलकर्णी याने पोलिसांकडे दिली. त्यामुळे आता पुढील तपासासाठी नाशिक पोलिसांचे पथक नागपुरात येणार आहे. यासोबतच कुलकर्णी याने नागपुरातील एका मित्रालाही काही रक्कम दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.