प्रवेश शुल्क जास्त असल्याने स्थानिकांची माघार
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना, नागपूर जिल्हा हौशी धनुर्विद्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच रेशीमबाग मदानावर महापौर चषक राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विविध राज्यातून तब्बल पंधराशे खेळाडूंनी विविध गटात सहभाग नोंदवला. मात्र, नागपूरकर खेळाडूंची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी होती. याचे कारण, स्पर्धेचे प्रवेश शुल्क जास्त होते.
पहिल्यांदाच शहरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात म्हणजे १०८ लक्ष्य लावून राष्ट्रीय दर्जाची महापौर चषक धनुर्विद्या स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, या उद्देशाने जिल्हा संघटनेने सर्व स्थानिक धनुर्विद्या क्लब आणि संघटना आणि शाळांना यात सहभागी होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, एका खेळाडूला सहभागी होण्यासाठी तब्बल साडेबाराशे रुपये भरावे लागत असल्याने स्थानिक खेळाडूंनी याला थंड प्रतिसाद दिला. तीन दिवसीय स्पर्धेत खेळाडूंची राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली होती.
बाहेरून आलेल्या खेळाडूंची आमदार निवासात राहण्याची तर जेवणाची सोय मदानावर होती. मात्र नागपूरच्या स्थानिक खेळाडूंना राहण्याची आणि जेवणाची गरज नसतानाही त्यांच्याकडूनही तेवढीच रक्कम घेण्यात येत असल्याने अनेक पालकांनी यावर नाराजी व्यक्त केली.
महापौर चषक असल्याने स्थानिकांना यात सवलत द्यायला हवी होती, अशी इच्छा पालकांनी व्यक्त केली. आतापर्यंत झालेल्या विविध खेळांच्या महापौर चषकामध्ये कोणत्याच प्रकारचे शुल्क घेण्यात आले नसून काही खेळात अल्प शुल्क आकारण्यात आले होते. मात्र या स्पर्धेत प्रतिखेळाडू बाराशे पन्नास रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले. नागपुरात सात ते आठ क्लब असून जवळपास तीनशेहून अधिक खेळाडू दररोज धनुर्वद्यिेचे प्रशिक्षण घेतात. अशात १७ वर्षांखालील राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेत स्थानिक खेळाडूंचा सहभाग जास्त हवा होता. मात्र, प्रवेश शुल्क जास्त असल्यामुळे केवळ
२८ खेळाडूच या स्पर्धेत सहभागी होऊ शकले.
राष्ट्रीय स्पर्धेचा खर्च मोठा असल्याने नाईलाजाने आम्हाला प्रवेश शुल्क साडेबाराशे ठेवावे लागले. महापौर चषक असल्याने स्थानिक खेळाडूंना सवलत द्यायला हवी होती. याबद्दल आम्ही विचारही केला होता. मात्र तीन दिवस शेकडो मुलांचा खर्च भागवणे सोपी गोष्ट नव्हती.
– मुकुल मुळे, अध्यक्ष नागपूर जिल्हा हौशी धनुर्विद्या संघटना