वर्धा : लग्न समारंभात तसेच गणेश व अन्य उत्सवात बँडचा निनाद गुंजतो. मात्र आता हा बँडबाजा शाळेत वाजणार आहे. तो सुरात वाजवल्यास पुरस्कार पण मिळणार. कारण तशी स्पर्धाच शिक्षण खात्याच्या शालेय प्राधिकरणाने आयोजित केली आहे. सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. एकता व देशाभिमानाची जाणीव निर्माण कारणे तसेच बँडच्या माध्यमातून कृती, साहस आणि प्रेरणा याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घ्यावा, असा या राष्ट्रीयस्तरावर संरक्षण व शिक्षण मंत्रालयातर्फे होणाऱ्या स्पर्धेचा हेतू आहे. राज्य, विभागीय व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेचे टप्पे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ सप्टेंबर ही जिल्ह्यातून नोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे. राज्यातील आंतरशालेय स्पर्धेतून चार संघ निवडल्या जातील. जानेवारीत दिल्लीत राष्ट्रीय स्पर्धा होणार. या बँड स्पर्धेचे पाईप बँड व ब्रास बँड असे दोन प्रकार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचा खर्च आयोजककडून तर विभागीय म्हणजेच राष्ट्रीय उपात्य स्पर्धेसाठी विद्या परिषद खर्च करणार. बँड पथकात व्यावसायिक व्यक्ती नको, पथकात २५ ते ३२ विद्यार्थी, मुलामुलींची चमू स्वतंत्र, सादरीकरण १० ते १५ मिनिटं, अश्या अटी आहेत. बँड द्वारे राष्ट्रीय गीत सादर करता येणार नाही.कोणतीही देशभक्तीपर गाण्याची धून, शास्त्रीय संगीतातील धून किंवा लोक संगीतातील धून वाजविणे अपेक्षित आहे.

हेही वाचा…नागपुरात पोस्टर वॉर, काँग्रेसची गांधीगिरी

बँड पथकात कोणतेही बॅनर, सूरी, कुकरी किंवा झेंडा वापरता येणार नाही. तसेच बँडचा पोशाख परिधान करावा लागेल. एका शाळेतून एका वेळी प्रत्येक प्रकारातील एक विद्यार्थ्यांचा तर एक विद्यार्थिनीचा असे चार बँड पथक स्पर्धेत सहभागी होवू शकतील. पोशाख, वाद्य, मारचिंग, धून सादरीकरण व त्यासाठी घेतलेला वेळ,एकूण परिणाम या निकषावर गुण मिळणार आहेत.२५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राष्ट्रीय उपात्य तर राष्ट्रीय स्पर्धा जानेवारी २०२५ मध्ये आयोजित होतील. पाईप बँडमध्ये पाईप १२, साईड ड्रम ८, ट्रेनर ड्रम्स २, ब्रास १ व कंडक्टर एक असे वादक व अन्य सहकारी अपेक्षित आहे. असेच ब्रास बँड बाबत असेल.

हेही वाचा…“महायुतीची सत्ता आल्यास अजित पवारच मुख्यमंत्री,” कुणी केला हा दावा?

राष्ट्रीय व राष्ट्रीय उपान्त पातळीवर भरघोस पुरस्कार ठेवण्यात आले असून सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो लागा धडाड धूमच्या तयारीस.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National band competition for school students a chance for unity and patriotism pmd 64 psg