वर्धा : राष्ट्रीय वैद्यकीय परीक्षा मंडळ म्हणजेच नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनिशन इन मेडिकल सायेन्सेस तर्फे विविध परीक्षा घेतल्या जातात. आता पदव्युत्तर पदवीसाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट पीजी २०२५ या परीक्षेची तयारी सूरू झाली आहे. ही नीट पीजी परीक्षा संगणक आधारित चाचणी पद्धतीने दोन सत्रात होत आहे.

ही महत्वाची समजल्या जाणारी परीक्षा १५ जून २०२५ रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या दिवशी रविवार आहे. वैद्यकीय क्षेत्रात ही महत्वाची पात्रता परीक्षा असल्याने देशभरातून लाखो विद्यार्थी यासाठी अर्ज करतात. राष्ट्रीय मंडळ लवकरच सदर परीक्षेसाठी अधिकृत माहिती देणारे बुलेटिन प्रसिद्ध करणार असल्याचे सांगण्यात येते. त्यात नोंदणीची तारीख, पात्रता, अर्ज प्रक्रिया, परीक्षा नमुना आदी तपशील नमूद केला असेल. या नीट पीजी साठी ठराविक अभ्यासक्रम राहणार. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया या सर्वोच्च संस्थेने निश्चित केलेल्या पदवीधर वैद्यकीय शिक्षण नियमावर आधारित तो राहणार. त्यात शरीरशास्त्र, शरीर क्रियाविज्ञान, जैव रसायनशास्त्र, स्त्रीरोग, बालरोग, त्वचाविज्ञान, रेडिओलोजी, या सारख्या विषयांचा समावेश राहणार.

परीक्षेनंतर ५० टक्के अखिल भारतीय कोटा यातील जागासाठी वैद्यकीय समुपदेशन समिती मार्फत समुपदेशन करण्यात येईल. उर्वरित ५० टक्के सिट्स साठी अपेक्षित समुपदेशन संबंधित राज्यांच्या समुपदेशन समितीकडून होणार आहे. देशातील एमडी, एमएस आणि पीजी डिप्लोमा या सारख्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी ही नीट पीजी परीक्षा अनिवार्य ठरते. एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर सर्वच वैद्यकीय विद्यार्थ्यांना या पीजी पदवीचे वेध लागतात. कारण पीजी असल्याशिवाय शासकीय, खाजगी महाविद्यालये तसेच शासकीय आरोग्य सेवा आणि स्पेशल वैद्यकीय सेवेत प्रवेश मिळत नाहीच. केवळ वैद्यकीय पदवी पुरेशी नसते. विदेशी प्रॅक्टिस तसेच वैद्यकीय संशोधन करण्यास पीजी आवश्यक आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील माहितीनुसार २०२४ मध्ये देशात पडव्युत्तरच्या ७३ हजार जागा उपलब्ध होत्या. २०२३ पेक्षा त्या ४ हजारपेक्षा अधिकने वाढल्या. यावर्षी ७५ हजार जागा उपलब्ध होणार असल्याची माहिती दिल्या जाते.डिप्लोमा ऑफ नॅशनल बोर्ड, डॉक्टरेट ऑफ नॅशनल बोर्ड साठी ही परीक्षा महत्वाची मानल्या जात असते. सरकारी तसेच खाजगी वैद्यकीय संस्थेत ही पदवी आता सेवेस अनिवार्य ठरली आहे. गतवर्षी या परीक्षेस २ लाख १६ हजार विद्यार्थी बसले होते.