नागपूर : विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती व्हावी, या मूळ उद्देशाने पर्यावरण युवा संसदेचे आयोजन करण्यात येते. २०२२ मध्ये भारताच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद दिल्लीतील लोकसभा संकुलात आयोजित करण्यात आली होती. पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या ‘स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट’ या संस्थेने याचे नियोजन केले होते. जानेवारी २०२४ मध्ये नागपूर शहरात राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदेचे आयोजन करण्यात आले असून १३० विद्यापीठांचे विद्यार्थी प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.
हेही वाचा – वर्धा : रात्रीची तपासणी भोवली, मत्स्य अधिकाऱ्याचा बोट अपघातात मृत्यू
राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली विद्यापीठस्तरीय फेरी नुकतीच पार पडली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयात प्राचार्य डॉ. रविशंकर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली फेरीचा समारोप झाला. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ अधिसभा सदस्य राज मदनकर, स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंटचे राष्ट्रीय समन्वयक मयूर जवेरी, पश्चिम विभागीय समन्वयक अबुजार हुसेन उपस्थित होते. विद्यापीठस्तरीय फेरीत नागपूर विदयापीठ विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया व वर्धा जिल्ह्यातील ४२ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. विद्यापीठ स्तरावर आयोजित केलेल्या भाषण स्पर्धेत ८४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी १० विद्यार्थ्यांची विभागीय फेरीसाठी निवड झाली आहे.