अकोला : आर्थिक दुर्बल घटक घटकातील विद्यार्थांसाठी ‘नॅशनल मिनस् कम मेरिट स्कॉलर्शिप’ ही योजना केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येत आहे. या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दर महिन्याला एक हजार रुपये प्रमाणे वर्षाला १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यास परीक्षा घेतली जात असून त्यामध्ये वाशीम जिल्ह्याच्या साखरा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील तब्बल ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी व पदव्युत्तर आदी शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागतो. आर्थिकदृष्ट्या कुटुंब कमकुवत असल्यास विद्यार्थी हुशार असल्यावरही तो पुढील शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्यावतीने आर्थिक दुर्बल घटकांतील हुशार विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे. त्यासाठी परीक्षा घेतली जाते. या योजनेचा उद्देश इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरित करणे आहे. या परीक्षेला बसणारा विद्यार्थी हा इयत्ता आठवीमध्ये शिकत असायला हवा. विद्यार्थ्याचे पालकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख ५० हजार पेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी सरकारी, नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकत असावा आणि इयत्ता सातवीमध्ये किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहे. या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसुचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के सूट देण्यात येते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ही रक्कम दरमहा एक हजार प्रमाणे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

वाशीम जिल्ह्याच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील ६८ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत उत्तीर्ण होऊन शाळेच्या नावलौकिकात भर घातली. या यशामागे विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांच्या मार्गदर्शनाचाही महत्वपूर्ण वाटा आहे. शाळेतील मुख्य मार्गदर्शक शिक्षक डिगांबर घोडके, मीना मापारी, संतोष आमले, संदीप अवचार, पी.टी. महाले आणि कुणाल व्यास या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठ्य-पुस्तकांच्या पलीकडे जाऊन समर्पित भावनेने अभ्यासाची गोडी लावली. विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करून त्यांना उत्साही व प्रेरित केले.