महेश बोकडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राज्यातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत मोठय़ा प्रमाणात प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) निरीक्षणादरम्यान इतर महाविद्यालयांतील प्राध्यापकांची उसनवारीवर बदली करून तेथे कार्यरत असल्याचे दाखवले जाते. हे काम झाल्यानंतर संबंधित प्राध्यापक मूळ संस्थेत परततात. हा खेळ थांबवण्यासाठी ‘एनएमसी’ने सर्व महाविद्यालयांत आता ‘बायोमेट्रिक’ हजेरी सक्तीची केली आहे.

वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारीत राज्यात २२ शासकीय आणि मोठय़ा अन्य खासगी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. बहुतांश महाविद्यालये पूर्वी भारतीय वैद्यकीय परिषदेच्या (एमसीआय) अखत्यारीत होती. कालांतराने ‘एमसीआय’ बंद करून केंद्र सरकारने ‘एनएमसी’ची निर्मिती केली. आता ‘एनएमसी’च्या आखत्यारीत ही महाविद्यालये येतात. तूर्तास राज्यातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी मुंबई, पुणेसह मोठय़ा शहरातील वैद्यकीय महाविद्यालय वगळता इतर ठिकाणी वैद्यकीय प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. मात्र शासन तातडीने ही पदे भरत नाही. त्यामुळे पदवी व पदव्युत्तरच्या जागेबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे एखाद्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निरीक्षण असल्यास वैद्यकीय शिक्षण खात्याकडून तेथे रिक्त जागा दिसू नये म्हणून प्रयत्न केले जातात. त्याअंतर्गत प्राध्यापकांच्या उसनवारीवर आयोगाचे निरीक्षण असलेल्या महाविद्यालयात बदली दाखवून तात्पुरते तेथे पाठवले जाते. तेथे निरीक्षणादरम्यान हे प्राध्यापक तेथे कार्यरत असल्याचा बनाव केला जातो. परंतु निरीक्षणानंतर लगेच हे प्राध्यापक त्यांच्या मूळ संस्थेत परततात. त्यामुळे प्राध्यापक कमी असल्याने एकीकडे रुग्णांना उपचार मिळत नाहीत, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. हा प्रकार ‘एनएमसी’च्या निदर्शनात आल्याने आता ‘एनएमसी’ने सगळय़ा वैद्यकीय महाविद्यालयांना ‘बायोमेट्रिक’ हजेरी सक्तीची केली सोबत या हजेरीला ‘एनएमसी’च्या दिल्ली कार्यालयाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यातील अनेक महाविद्यालयांत वैद्यकीय प्राध्यापकांची पदे रिक्त  त्यातून राज्यात उसनवारीवर प्राध्यापकांच्या बदल्यांचा खेळ सुरू होतो. 

डॉ. समीर गोलावार, सचिव, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना

नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बायोमेट्रिक हजेरी सुरू झाली आहे. लवकरच ती  ‘एनएमसी’शी जोडली जाणार आहे.   – डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडीकल, नागपूर