लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाणार नाही असे आश्वासन राज्य सरकारने आम्हाला दिले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने कसा सोवडवावा हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत, असे विधान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन ७ ऑगस्टला पंजाबमधील अमृतसरला होत आहे. त्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. तायवाडे बोलत होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिला जाऊ नये. ही आमची भूमिका आहे. तसेच मराठा समाजातील लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासही आमचा विरोध आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाणार नाही. असे लेखी आश्वासन आम्हाला दिले आहे. आता राहता राहिला मुद्दा जरांगे पाटील यांच्या मागणीचा. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवायचा हे त्यांनी ठरवावे. आम्हाला त्यात पडायचे कारण नाही. परंतु आम्ही राज्य सरकारने शब्द पाळावा. यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही तायवाडे म्हणाले. पत्रकार परिषदेला शरद वानखेडे, सुषाम भड उपस्थित होते.

आणखी वाचा-चंद्रपूर : खा. अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारो… मनुवादी, चातुर्वर्ण्य विचारधारेचा काँग्रेसकडून निषेध

अमृतसर येथील अधिवेशनात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना, ओबीसी क्रिमिलेअर मर्यादावाढ, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, आरक्षणासाठी ५० टक्क्यांची अट रद्द करा यासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने मंथन होईल. या दरम्यान मान्यवाराच्या हस्ते ‘लढा संविधानिक हक्काचा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाब विधानसभेचे उपसभापती जय क्रिष्ण सिंग, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्रातील ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, क्रिकेटपटू तथा राज्यसभा सदस्य हरभजन सिंग, पंजाबमधील ‘आप’चे आमदार संतोष कटारिया, हरयाणाचे माजी खासदार राजकुमार सैनी यांची प्रमुख उपस्थित राहील.

आणखी वाचा-वर्धा : खळबळजनक! वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीची चौथ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या

‘जात’ विचारण्याचा निषेध

लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेत जातनिहाय गणना करण्याची मागणी केली. यावरू भाजपचे माजी मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘ ज्यांना आपली जात माहिती नाही ते जातनिहाय गणना’ करण्याची मागणी करीत आहेत, असे आक्षेपार्ह विधान केले. तर ठाकूर यांचे संसदेतील भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (ट्विट) वर टाकून ठाकूर यांना शाब्बाशकी दिली. अशाप्रकारे जातनिहाय गणना करणाऱ्यांना जात विचारून हिनवण्याच्या प्रकाराचा निषेध राष्ट्रीय ओबीसी महासंघ करीत असल्याचे डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National president of national obc federation dr babanrao taiwade reacts on maratha reservation rbt 74 mrj