लोकसत्ता टीम
गडचिरोली : एकीकडे मूलभूत सुविधांची वानवा, शिक्षणाचा अभाव आणि दुसरीकडे नक्षलवाद्यांची दहशत अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितून वाट काढत एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी या अतिदुर्गम आदिवासी गावात शिक्षणाचे बीज रोवणारे शिक्षक मांतय्या बेडके यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातून केवळ दोन शिक्षकांना हा पुरस्कार घोषित झाला असून ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बेडके यांच्या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून ३०० किमी अंतरावरील सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम पातागुडम येथे हे मांतय्या बेडके यांचे मूळ गाव. गावाजवळील अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. पुढे वर्ध्याला उच्च शिक्षण घेऊन सिरोंचातून ‘डीएड’ पूर्ण केले. यानंतर त्यांना जाजावंडीच्या प्राथमिक शाळेत २०१० मध्ये नियुक्ती झाली. मूलभूत सुविधाही नसलेल्या गावात शिक्षणाबद्दल प्रचंड अज्ञान होते. तरीही या गावातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचा निर्धार मांतय्या यांनी केला. बहुतांश पालक अशिक्षित असल्याने त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु मांतय्या यांनी माघार घेतली नाही. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद सुरू ठेवला. खेळ, कला, नृत्य, शिक्षण याविषयी घरोघरी भेटी देऊन महत्व पटवून देऊ लागले.
आणखी वाचा-हे काय..! पावसाच्या परतीची वेळ असताना आता चक्रीवादळाचा इशारा
शिक्षक मांतय्या बोडके यांच्या प्रयत्नानंतर जाजावंड येथील विद्यार्थ्यांमध्ये रुची वाढली. त्याचा सकारात्मक परिणाम पटसंख्येवर झाला. ती वाढू लागली. लोकवर्गणीतून मांतय्या यांनी शाळेच्या इमारतीची दुरुस्ती आणि रंगरंगोटी केली. विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे देणे सुरू केले. आज ही शाळा डिजिटल झाली आहे. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने घेण्यात आली आहे. एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी हे गाव नक्षल कारवायांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाते. पण, मांतय्या यांच्या अथक परिश्रमाणे आज या परिसरात शिक्षणाची गंगा वाहू लागली आहे.
नावीन्यपूर्ण उपक्रमाची पालकांना भुरळ
डिजिट शिक्षणासाठी नेटवर्कची समस्या असल्याने बेडके यांनी शाळेसमोरील झाडावर ‘अँटीना’ बांधून विध्यार्थ्यांना डिजिटलचे धडे दिले. यासोबतच तीन वर्षांपासून या शाळेतील विद्यार्थी क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल क्रमांक पटकावत आहेत. हे पाहून दहा पालकांनी एटापल्ली आणि आलापल्लीच्या कॉन्व्हेंटमधून मुलांना काढून मांतय्या यांच्या सरकारी शाळेत पाठविण्यास सुरुवात केली आहे. सध्या या शाळेत वसुली, ताडगुडा, गट्टा, गट्टागुडा, गट्टाटोला, पुस्कोटी राजवंडी टोला अशा चार किमी परिसरातील दहा गावांतील विद्यार्थी या शाळेत येत आहेत.
आणखी वाचा-वर्धा : बहिणी लाडक्या मतदार नसल्याने वंचित, भांडी न मिळाल्याने हिरमुसल्या
बेडके यांनी दुर्गम भागात दिलेल्या सेवेचा अभिमान
मांतय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रातील फक्त दोनच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. बेडके यांनी अतिदुर्गम आदिवासी भागात दिलेल्या सेवेचा अभिमान वाटतो असेही आयुषी सिंह म्हणाल्या.