लोकसत्ता टीम

नागपूर : गुन्हेगारी तपासात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या न्यायवैद्यकशास्त्रच्या देशभर विस्तारीकरणाच्या क्रमात केंद्रीय गृह विभागाने देशाच्या केंद्रबिंदू असलेल्या नागपूरमध्ये राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठाच्या स्थापनेबाबत परिपत्रक प्रकाशित केले. नागपूरसह छत्तीसगडमधील रायपूर आणि ओडिशामधील खोरधा या तीन ठिकाणी राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठाची स्थापना करण्याचे परिपत्रक मंगळवारी प्रकाशित करण्यात आले.

गुजरातच्या गांधीनगर येथे राज्य न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठाचे विस्तारीकरण करत त्याला राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठाचे स्वरूप देण्यात आले. आता देशातील इतर भागात विद्यापीठाची स्थापना केली जात आहे. महाराष्ट्रात यापूर्वी २०२२ मध्ये पुणे येथे राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठाची सुरुवात करण्यात आली. नागपूरमध्ये स्थापित होणारे विद्यापीठ राज्यातील अशाप्रकारचे दुसरे विद्यापीठ राहील. दोन दिवसांपूर्वीच नागपूरमधील विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली. नागपूरच्या विद्यापीठात प्रवेशप्रक्रिया १८ मार्चपासून सुरू झाली असून ५ मेपर्यंत चालणार आहे.

या विद्यापीठात एमएससी फॉरेन्सिक सायन्स, सायबर जर्नलिझम आणि क्राईम सीन मॅनेजमेंट या विषयाचे अभ्यासक्रम उपलब्ध असतील. राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठामुळे नागपूरच्या शैक्षणिक वैभवात भर पडली आहे. याचा लाभ देशभरातील फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांना, संशोधकांना व कर्मचाऱ्यांना होणार आहे. प्रस्तावित विद्यापीठ विकसित भारताच्या संकल्पात महत्त्वाचे योगदान देईल, हा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून केंद्र सरकारचे आभार मानले आहे.

कामठीमध्ये ५० एकरात कॅम्पस

राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठाची स्थापना कामठी मार्गावरील चिचोली येथील ५० एकर जागेवर केली जाईल. सुरुवातील विद्यापीठात तीन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जात असले तरी येत्या वर्षात न्यायवैद्यक क्षेत्र, सायबर क्षेत्रातील इतर अभ्यासक्रमेही यात सुरू होतील. देशात नवे कायदे लागू झाल्यावर न्याय क्षेत्रात न्यायवैद्यकशास्त्राचे महत्त्व फार वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील विद्यापीठ विदर्भाच्या विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रात करिअरचे नवे दार उघडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजूर केलेले तिन्ही विद्यापीठ राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ कायदा, २०२० नुसार स्थापन केले जातील. नागपूरमध्ये राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे १० वे कॅम्पस सुरू होणार आहे, यामुळे भारतातील उच्च शिक्षणाचे केंद्र म्हणून नागपूरचा दर्जा आणखी मजबूत होईल, एनएफएसयूच्या समावेशामुळे शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात भर पडणार आहे.

Story img Loader