बुलढाणा : लोणार म्हटले की, पर्यटकासमोर केवळ आणि केवळ जगप्रसिद्ध खऱ्या पाण्याचे सरोवरच येते. पण इथे दैत्यसुदन मंदिर सारखी पुरातन अद्भुत मंदिरे आहेत, गोमूख धार, सीता न्हाणी भस्म टेकडी, हटकेश्वर, पाप हरेश्वर सारखी हेमाडपंथी मंदिरे आहेत. ही पुरातन कालीन स्थळे, धार्मिक, सांस्कृतिक वारसा आहे…
यामुळे पुराणात विरजक्षेत्र म्हणून उल्लेख असलेल्या लोणार उर्फ उल्का नगरीत यायचं तर येणाऱ्यांनी थोडं फुरसदीने आलेले बरं. मात्र लोणार ची सफर झाली की लगेच आपल्या गावाच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघू नये. बरं जायचेच आहे तर लोणार पासून जेमतेम विसेक किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमठाणा गावांनजिक जा. तिथे मानवाचा, कलावंतांचा नव्हे तर निसर्गाचा चमत्कार, कला अविष्कार पाहवंयास मिळतो.लोणार पासून २१ किलोमीटर अंतरावर, मराठवाडयातील निसर्गाच्या कुशीत देवठाना गावा लगत असलेल्या खडकपूर्णा नदी जवळ पोहोचला तर पर्यटकांचे डोळे विसफरतात आणि ते स्वतः थक्क होतात.निसर्गाच्या चमत्काराने, नदीतील जल आणि दगड यांची शिल्पे पाहावंयास मिळतात. नदीच्या पात्रात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या रांजन खळग्यांनी लक्ष वेधून घेतले जाते .
पश्चिमे कडून वाहत खड़कपूर्णा नदीचे पात्र एका टेकडिला वळसा घालते. त्यामुळे येथे एक विशिष्ट परिस्थिति निर्माण होऊन रांजन खळग्यांची निर्मिती झाली आहे. या खळग्यांचे सौंदर्य आणि त्यातून वाहणारे निर्मळ पाणी यामुळे हा परिसर भविष्यात लोणार सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्या निसर्गप्रेमी व पर्यटकांसाठी खास आकर्षणाचे केंद्र ठरणार हे नक्की .
खडकपूर्णा नदी मराठवाड़डया तील देवठाना गावाच्या हद्दीतून वाहते. या नदीच्या पात्रात, विशेषतः पावसाळ्यानंतर, मोठमोठे खळगे तयार होतात, ज्यांना “रांजन खळगे” असे म्हणतात. पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे खडक झिजून या नैसर्गिक खळग्यांची निर्मिती होते. काही खळगे खोल आणि विस्तीर्ण असून त्यामध्ये पाणी वर्षभर टिकून राहते.
निघोजचे रांजन खळग्यां बाबत भूगोलाच्या पुस्तकात सर्वांनी वाचले आणि पाहिले आहे. तसाच भू-जलीय अविष्कार लोणार पासून २१ किमी अंतरावर असलेल्या खड़कपूर्णा नदीच्या पात्रात दृष्टि क्षेपास आला आहे. निसर्गप्रेमी मध्ये या खळग्यांचे आकर्षण वाढत आहे.खडकपूर्णा नदीतील हे रांजन या परिसरातील अनोखी निसर्गदालने ठरत आहेत. योग्य संवर्धन आणि प्रसिद्धी मिळाल्यास हे ठिकाण भविष्यात एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाऊ शकते.
उन्हाळ्यातही या खळग्यां मधील पाण्याचा प्राणी आणि पक्षांना मोठा आधार मिळतो. पर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर विकसित करण्याची गरज स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. योग्य नियोजन आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास हा परिसर एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकतो. स्थानिक प्रशासनाने येथे स्वच्छता, सुरक्षेच्या उपाययोजना आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
खड़कपूर्णा नदी पत्रातील रांजन खळगे हे भु -जलीय वारसा आहे. शेकडो (हजारो?) वर्षा पासून नदीच्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत आलेल्या लहान मोठे दगड पात्रातील खळग्यांममध्ये गोल फिरत आहे या दगडांच्या घर्षना मुळे हे रांजन खळगे निर्माण झाले आहे, सुमारे दोन किलोमीटरच्या पट्ट्यात ही अद्भुत शिल्पे आहेत,अशी माहिती निसर्ग प्रेमी लोणार संतोष जाधव (लोणार ) यांनी दिली.
बेसाल्ट आणि गोट्याचा मनोहरी ‘संघर्ष’
नदीच्या पात्रातील टेकडीच्या दोन्ही बाजूने बेसॉल्ट खडक आहे.नदीने वाहून आणलेले दगड-गोटे या बेसॉल्ट खडकावरील खोलगट भागात अडकुन पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड-खोटे या भागात गोलगोल फिरून खोलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर झाले . या प्रक्रियेला थोडी-थोडकी नव्हे तर हजारो वर्षे लागली आहे. कालांतराने या खड्ड्यांचे रांजणाकार खळग्यांत रूपांतर झाले आहे.