चंद्रपूर : नवरगाव येथील श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींच्या कलाकृतीची मुंबईच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जहांगीर आर्ट गॅलरीत मान्सून शोसाठी निवड झाली असून तेथे आयोजित प्रदर्शनात दोन्ही कलाकृतीला मानाचे स्थान मिळाले आहे.
संपूर्ण देशभरातून काही निवडक कलाकृतीचीच या शोसाठी निवड केली जाते हे विशेष. एवढेच नाही तर प्रदर्शनादरम्यान दोन्ही कलाकृतींची विक्रीसुद्धा झाली. मुंबईच्या एका कला रसिकाने सदर चित्रकृती खरेदी करून दोघीही कलाव्रतीचं कौतुक केलं. रेखा व रंगकला अंतिम वर्षाला शिकणारी कु. रमया डिकोंडा हिच्या जर्नी आणि कु. दीपाली सोनवाने हिच्या वेट अँड वॉच या कलाकृतीला हा सम्मान मिळाला.
दोन्ही चित्रे तैलरंगात केली आहेत. अन्य कलावंत विध्यार्थ्यांसाठी ही प्रेरणादायी बाब असून महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल कामडी तसेच भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत बोरकर, सचिव सदानंद बोरकर यांनी दोघींचेही अभिनंदन केले आहे.