भंडारा : Navegaon-Nagzira Sanctuary Tiger नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील राज्याचा पहिला मोठा संवर्धन ट्रान्सलोकेशन प्रयोग अंतिम टप्प्यात असून ब्रह्मपुरी येथून आणलेल्या २ वाघिणींना नागझिरा कोअर झोन मध्ये सुरक्षितपणे पोहचविण्यात आले आहे. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण, नवी दिल्लीचे अधिकारी आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर) चे अधिकारी व डॉक्टर यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर उद्या शनिवारी २० मे रोजी या दोन वाघिणीना नवेगाव नागझिरा अभयारण्यातील त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा हे अत्यंत घनदाट आणि आकर्षक जंगल असूनही गेल्या १० वर्षात जय-वीरूसारख्या वाघांच्या स्थलांतरामुळे नागझिरा अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने घटत आहे. या जंगलात एकूण १२ वाघ असले तरी त्यापैकी ९ वाघ आणि ३ वाघिण आहेत. अलीकडेच कोका अभयारण्यात विषबाधेमुळे टायगर- टी १३ चा मृत्यू झाला होता. नवेगाव नागझिरा अभयारण्यात समतोल राखण्यासाठी, वाघांचे हस्तांतरण करण्याचा प्रयोग राज्यात प्रथमच केला जात असून तो लवकर पूर्ण करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेतला आहे.
नागझिरामध्ये एकूण ४ मादी वाघिणींना सोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात सोडण्यात येणार्या २ वाघिणीना अजूनही पकडण्यात यश न आल्याने हा महत्त्वाचा प्रकल्प वर्षभराहून अधिक काळ खोळंबला होता. रॅपिड रेस्क्यू टीमने ताडोबातून दोन वाघिणी पकडल्या आहेत. रविवारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा रेंजमधून हिरडी नाला वाघिणीच्या बछाड्याला पकडण्यात आले असून, सोमवारी रात्री उशिरा नागझिरा येथे सुरक्षितपणे पोहचविण्यात आले.
हेही वाचा >>> नागपूर : ७५ हजार पदभरतीसंदर्भात मोठा निर्णय, वाचा सविस्तर…
मंगळवारी सकाळी गडचिरोलीच्या आरमोरी रेंजमधून अडीच वर्षांची टी-४ वाघीण पकडण्यात आली, तिला बुधवारी सकाळी ६.४५ वाजता नवेगाव नागझिराच्या पिटेझरी गेट येथून नागझिरा येथे आणण्यात आले. उद्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या दोन्ही वाघिणीना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब नागझिरा येथे येताच आज शुक्रवारी वाघिणींना रेडिओ कॉलर केले जाईल. नागझिरामध्ये सॅटेलाइट कॉलर बसवल्यानंतर वाघिणींना सोडण्यासाठी दोन पॉइंट्स ओळखण्यात आले आहेत. साकोली येथे नियंत्रण कक्ष असलेल्या समर्पित टीमद्वारे वाघांवर २४ तास लक्ष ठेवले जाईल.