अमरावती : जिल्‍ह्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापायला लागले आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्‍या भाजपच्‍या नेत्‍या नवनीत राणा या भाजपच्‍या प्रचारासाठी मैदानात उतरल्‍या आहेत, तर त्‍यांचे पती आमदार रवी राणा यांनी युवा स्‍वाभिमान पक्षाचा झेंडा घेऊन बडनेरासह जिल्‍ह्यातील चार जागांची मागणी महायुतीकडे केली आहे. दर्यापूर मतदारसंघात नवनीत राणा यांचे दौरे वाढल्‍याने त्‍या या ठिकाणाहून निवडणूक लढणार का, याची उत्‍सुकता ताणली गेली आहे. यावर नवनीत राणा यांनी प्रथमच भाष्‍य केले आहे.

राणा दाम्‍पत्‍याने शुक्रवारी दुपारी त्‍यांच्‍या शंकरनगर निवासस्‍थानापासून अनवाणी पायी चालत अंबादेवी मंदिरात पोहचून दर्शन घेतले. त्‍यानंतर पत्रकारांशी बोलताना नवनीत राणा यांनी विरोधकांना टोला लगावला. नवनीत राणा म्‍हणाल्‍या, मला राज्‍यभरात भाजपचा प्रचार करण्‍यासाठी फिरायचे आहे. दर्यापूरसह, अचलपूर, मेळघाट मतदारसंघांमध्‍ये फिरून मी मतदारांचे आभार व्‍यक्‍त करीत आहे. या जिल्‍ह्याची सून म्‍हणून मी मतदारांना भेटवस्‍तू देत आहे. त्‍यावरून विरोधकांनी आकांडतांडव करण्‍याची गरज आहे. मी येत्‍या काळात लोकसभा किंवा राज्‍यसभेत प्रतिनिधित्‍व केले पाहिजे, अशी भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांची इच्‍छा आहे. जिल्‍ह्यातील बहुतांश जागा कमळ चिन्‍हावर लढल्‍या जाव्‍यात, यासाठी माझे प्रयत्‍न सुरू आहेत. जे बाहेर राहतात, त्‍यांना जिल्‍ह्यातील काहीही माहिती नाही, ते उगाच टीका करीत आहेत. रवी राणा यांचा पाना सर्व विरोधकांचे नट कसणार आहे. (रवी राणांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षाला पाना हे निवडणूक चिन्‍ह मिळाले आहे) बडनेरा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्‍हणून ते चौथ्‍यांदा निवडून येतील, असा विश्‍वास नवनीत राणा यांनी व्‍यक्‍त केला.

हेही वाचा – “भावी हा भावीच असतो”, प्रफुल्ल पटेल यांचा पटोलेंना चिमटा, पटोलेंचेही प्रत्युत्तर

हेही वाचा – ”तुम्‍ही आमदार नाही, सावकार निवडून दिला….”, रवी राणांवर तुषार भारतीय यांची टीका

चार जागा मागितल्‍या : रवी राणा

नवनीत राणा या भाजपच्‍या नेत्‍या आहेत. जिल्‍ह्यातील बहुतांश जागांवर कमळ चिन्‍ह असावे, अशी त्‍यांची इच्‍छा असली, तरी आपण बडनेरा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपूर या चार जागा महायुतीकडे मागितल्‍या आहेत. युवा स्‍वाभिमान पक्षाने या जागा लढण्‍याची तयारी केली आहे. नवनीत राणा या संपूर्ण जिल्‍ह्यात भाजपच्‍या प्रचारासाठी फिरत आहेत. त्‍या विधानसभेच्‍या मैदानात उतरणार नाहीत. त्‍या फक्‍त भाजपचा प्रचार करतील. भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांनी त्‍या राज्‍यसभेवर निवडून जातील, असे सांगितले आहे आणि राज्‍यसभा हे त्‍यांच्‍यासाठी योग्‍य सभागृह आहे, असे रवी राणा यांनी सांगितले.