संपूर्ण देशभरात आज (६ एप्रिल) हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे. अमरावतीमध्ये देखील हनुमान जयंतीचा मोठा उत्सव साजरा करण्यात आला. स्थानिक खासदार नवनीत कौर राणा आणि आमदार रवी राणा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमावेळी लोकांशी बोलताना खासदार नवनीत कौर राणा त्यांना तुरुंगातील दिवस आठवले. वर्षभरापूर्वी राजद्रोहाच्या खटल्याअंतर्गत त्यांना तुरुंगवारी सोसावी लागली होती.
तुरुंगातील एक प्रसंग सांगताना राणा यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. राणा म्हणाल्या की, तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने केवळ हनुमान चालिसाचे पठण केले म्हणून आम्हाला १४ दिवस तुरूंगात डांबले. नवनीत कौर राणा म्हणाल्या, एका महिला लोकप्रतिनिधीवर अन्याय करण्यात आला, तुरूंगात माझा छळ झाला. माझी लहान मुले मला विचारत होती, तू असा काय गुन्हा केला, पण निर्दयी उद्धव ठाकरे सरकारला केवळ आमच्यावर सूड उगवायचा होता.
खासदार राणा म्हणाल्या की, मला तुरुंगात ठेवण्यात आलं तेव्हा मी भगवी साडी नेसलेली होती आणि रात्रभर मी उभी होते. त्यांनी मला बसायलाही काही दिलं नव्हतं. त्यावेळी एक कॉन्स्टेबल म्हणाला की, मॅडम तुम्ही रात्रीपासून सकाळपर्यंत उभ्या आहात. आम्हाला हे पाहावत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व हवालदार येऊन मला भेटले आणि म्हणाले मॅडम ही जागा तुमच्यासाठी नाही. पण आम्ही काहीच करू शकत नाही, पण एक गोष्ट नक्की आहे की, तुम्ही इथून निघाल तेव्हा झाशीची राणी बनून बाहेर पडाल.
राणा म्हणाल्या की, आमच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर आम्हाला लगेच जामीन मिळेल असं वाटलं. परंतु, कोर्टाने जेव्हा पोलीस डायरी पाहिली तेव्हा त्यात आमच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला होता. त्यात लवकर जामीन होत नाही. त्यामुळे आम्हाला तुरुंगात राहावं लागणार होतं.
खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं की, आम्हाला कधीपर्यंत तुरुंगात रहावं लागेल हे माहिती नव्हतं. तेव्हा मी भावूक झाले होते. तुरुंगात १२ तास उभी राहून विचार करत होते. पण सकाळी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे मला दुःख सहन झालं नाही. तुरुंगात पाणी मागितलं तर मला सांगण्यात आलं, इथे सीसीटीव्ही आहे, पाणी देऊ शकत नाही.