अमरावती : दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यात पुन्हा एकदा वाक युद्ध सुरू झाले असून बच्चू कडू यांनी चांदूर बाजार येथे नवनीत राणा यांच्यावर केलेल्या टीकेनंतर नवनीत राणा यांनी शेरो-शायरीतून त्यावर प्रत्युत्तर दिले आहे. “जल गया सब कुछ बचा ही क्या…”, असे वक्तव्य बच्चू कडूंनी नवनीत यांच्या पराभवाविषयी केले होते, त्यावर नवनीत राणा म्हणाल्या “बच गयी मै, तो जला ही क्या”.
दोन दिवसांपूर्वी परतवाडा येथील दहीहंडी कार्यक्रमात नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. बच्चू कडू हे तोडीबहाद्दर, ढोंगी, ब्लॅकमेलर, नाटकबाज आहेत, त्यांना अचलपूरची जनता धडा शिकवणार, असा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान, बच्चू कडू यांनी चांदूर बाजार येथील कार्यक्रमात बोलताना राणा दाम्पत्याचा शेरो-शायरी आणि खास वैदर्भीय भाषेत समाचार घेतला होता. आलतू-फालतू कुणी बोलले, त्याकडे लक्ष द्यायचे नाही. ‘किस गली के खसखस है वो, और कहां से आये है वो.. आग लग गयी है, तो धुवां तो उठने वाला है’, अशा शब्दात राणा दाम्पत्यावर टीका केली होती.
हेही वाचा – चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
हेही वाचा – बुलढाणा : गुन्हेगाराचा तलवारीने वार, पोलिसांनी केला गोळीबार!
दरम्यान, या टीकचा संदर्भ देत नवनीत राणा यांनी रविवारी सायंकाळी येथील नवाथे चौकात आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बच्चू कडूंना प्रत्युत्तर दिले. नवनीत राणा म्हणाल्या, विरोधकांनी एकत्र येऊन आपला पराभव केला, पण त्यामुळे अमरावती जिल्हा विकासाच्या बाबतीत दहा वर्षे मागे गेला आहे. करोनानंतर आपल्याला मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी केवळ अडीच वर्षे मिळाली, पण याही कालावधीत बडनेरा वॅगन प्रकल्प, विमानतळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेगा टेक्स्टाईल पार्क यासारखे प्रकल्प आपण मार्गी लावले. ही मोठी उपलब्धी आहे. पण काही लोकांच्या डोळ्यात हे खुपत होते. विरोधकांनी एकत्र येऊन आपला पराभव केला. केवळ खासदारकी गेली आहे, पण अजूनही मी जिवंत आहे आणि लढाई संपलेली नाही.
नवनीत राणा म्हणाल्या, काही लोक हे चपलेसारखे असतात, ते आपल्या सोबत असतात पण चालत असताना चिखल उडवत असतात. याचा रोख कुणाकडे आहे, हे लोकांना चांगले माहीत आहे, असे सांगून त्यांनी कुणाचेही नाव घेणे टाळले.
© The Indian Express (P) Ltd