लोकसत्‍ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्‍टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राज्‍यात प्रचार करण्‍यासाठी ४० स्‍टार प्रचारक फिरणार आहेत. त्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्‍यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्‍यासह अनेक दिग्‍गजांचा समावेश आहे. अमरावती लोकसभा मतदार संघातून पराभूत झालेल्‍या माजी खासदार नवनीत राणा यांना देखील स्‍टार प्रचारकांच्‍या यादीत स्‍थान देण्‍यात आले आहे.

भाजपशासित राज्‍यातील बहुतांश मुख्‍यमंत्र्यांचा देखील स्‍टार प्रचारकांच्‍या यादीत समावेश करण्‍यात आला आहे. राज्‍यातील अनेक दिग्‍गज हे स्‍वत:च्‍या मतदारसंघासोबतच इतरही मतदारसंघांमध्‍ये प्रचार करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍यासह देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, अशोक चव्‍हाण, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, नारायण राणे, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्‍ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, अशोक नेते, संजय कुटे यांचा स्‍टार प्रचारकांमध्‍ये समावेश आहे. विशेष म्‍हणजे स्‍मृती इराणी आणि नवनीत राणा यांनाही स्‍टार प्रचारक म्‍हणून जबाबदारी देण्‍यात आली आहे.

आणखी वाचा-शेखर शेंडेंना काँग्रेसकडून उमेदवारी; पण शरद पवार गटाने व्यक्त केली ‘ही’ शक्यता

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नवनीत राणा यांना अमरावती मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. नवनीत राणा या हैदराबाद येथे देखील भाजपचा प्रचार करण्यासाठी पोहोचल्या होत्या. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत देखील नवनीत राणा या भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारक असतील. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नवनीत राणा यांनी केलेल्‍या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत देखील नवनीत राणा यांच्या वक्तव्यांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

माजी खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकारच्‍या वतीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची (सीआयएसएफ) वाय दर्जाची सुरक्षा उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. पण त्‍यांना नुकतेच ११ ऑक्‍टोबर आणि १४ ऑक्‍टोबरला जिवे मारण्‍याच्‍या धमकीचे पत्र मिळाले आहे. हे पत्र हैदराबादमधील अज्ञात व्‍यक्‍तीने पाठवले आहे. त्‍यामुळे त्‍यांची सुरक्षा व्‍यवस्‍था अधिक मजबूत करण्‍यात आली आहे.

आणखी वाचा-विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी… वसतिगृह प्रवेशातील ‘विशेष कोटा’ अखेर रद्द…

हैदराबाद येथील एका सभेत ८ मे रोजी नवनीत राणा यांनी ओवेसी बंधूना आव्‍हान दिले होते. जर हैदराबादमध्ये पोलिसांनी १५ सेकंद माघार घेतली, तर दोन्ही भाऊ (ओवेसी बंधू) कुठे गेले हे कळणारही नाही. राणांचे हे विधान २०१३ मध्ये अकबरुद्दीन ओवेसी यांनी दिलेल्या भाषणाला प्रत्युत्तर मानले गेले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana is bjps star campaigner for assembly election mma 73 mrj