मोहन अटाळकर
अमरावती : सुमारे पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक मुद्यांवरून लक्ष्य करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा कडवट हिंदुत्वाचे राजकारण आणि भाजप प्रवेशापर्यंतचा प्रवास खाचखळग्यांचा, लक्षवेधी आणि तितकाच वादग्रस्तही ठरला आहे.
मुंबई येथे पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या नवनीत कौर-राणा यांनी मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. काही संगीत अल्बममध्ये झळकल्यावर त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अनेक तेलगू आणि कन्नड चित्रपटांमधून नवनीत यांनी भूमिका केल्या. योगगुरू रामदेव बाबा यांच्या माध्यमातून आमदार रवी राणा आणि नवनीत यांची ओळख झाली. २०११ मध्ये अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर सामूहिक विवाह सोहळय़ात त्या रवी राणा यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या.
नवनीत राणा या लवकरच राजकारणात सक्रीय होतील, याचा अंदाज अनेकांना आला होता. अमरावती या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून नवनीत राणा यांनी पहिली निवडणूक २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर लढवली. त्यावेळी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांचा १.३७ लाख मतांनी पराभव केला, पण त्याचवेळी राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढविल्याची तक्रार अडसूळ यांनी केली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्यानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी निर्णय प्रलंबित आहे. न्यायालयाचा निकाल लागलेला नसताना नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी घोषित करणे, हा मुद्दादेखील वादग्रस्त ठरला आहे.
हेही वाचा >>>एएनआयच्या पत्रकाराची पीटीआयच्या महिला पत्रकाराला मारहाण; Video शेअर करत वृत्तसंस्थेनं केली कारवाईची मागणी!
२०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नवनीत राणा यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा ३६,९५१ मतांनी पराभव केला होता.
निवडणुकीनंतर त्यांनी लगेच केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा दिला. शरद पवार यांचे गुणगाण गाणाऱ्या राणांनी नरेंद्र मोदींचे गोडवे गायला सुरुवात केली. पुढे तर भाजपच्या खासदार असल्यासारखे त्यांनी भाजपची बाजू लावून धरली. एकगठ्ठा मतदान करणाऱ्या दलित आणि मुस्लीम मतदारांचा त्यांनी विश्वासघात केल्याचा आरोप अजूनही होतो.
गेल्या पाच वर्षांच्या काळात नवनीत राणा यांची हिंदुत्ववादी राजकारणावर भर दिला. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा हट्ट धरला. कायदा सुव्यवस्थेच्या उल्लंघनाप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर दोन आठवडे त्यांना तुरूंगामध्ये राहावे लागले. पण त्यामुळे त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली.
सर्व आमदारांशी वैर
युवा स्वाभिमान पक्षाचा विस्तार करण्याच्या महत्वाकांक्षेतून जिल्ह्यातील सर्व आमदारांशी त्यांनी वैर पत्करले. जिल्हा पातळीवरील निधी वाटपावरूनही अनेकांशी खटके उडाले. प्रत्येक बाबतीत श्रेय घेण्याची राणा यांची धडपड यामुळेही नवनीत राणा वादात सापडल्या. माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार बच्चू कडू हे त्यांच्या विरोधात आहेत. आमदार सुलभा खोडके, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय खोडके यांच्याशी त्यांचे सख्य नाही. भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण पोटे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकाऱ्यांचा रोष रवी राणा यांनी ओढवून घेतला आहे.
राणांना विरोध करणारेही एकत्र काम करतील – बावनकुळे
विकसित भारताच्या संकल्पनेला साथ देण्यासाठी नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महायुतीमध्ये कुठलाही वाद नाही. राणांच्या उमेदवारीला विरोध करणारे सर्व एकत्र येऊन त्यांचा प्रचार करतील आणि मोठय़ा मताधिक्यांने त्या अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडून येतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. अमरावती लोकसभा मतदार संघासाठी नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा कोराडी येथे भाजपमध्ये प्रवेश केला.