लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पथ्यात येत असतांना संभाव्य उमेदवार हे मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नाना उपक्रम घेत आहे. मतदार अशा उपक्रमात हमखास हजेरी लावणार हे गृहीत धरल्या जाते. प्रसिद्धीच्या वलयात असणारे चेहरे या काळात मतदारसंघात येणार व जनतेचे लक्ष वेधून घेणार, असा हा प्रयत्न असतो. त्यातही यावेळी काँग्रेसकडून तिकीट मागणाऱ्या इच्छुकांत महिला नेत्या अधिक असल्याचे चित्र आहे.

आता आज दोन वलंयांकित चेहरे वेगवेगळ्या भागात गाजणार. भाजपची मुलुख मैदान तोफ म्हणून चर्चेत राहणाऱ्या माजी खासदार नवनीत राणा आज वर्धा दौऱ्यावर आहेत. त्या केळझर येथील सिद्धी विनायक मंदिरात महाआरती करणार. तसेच आमदार डॉ. पंकज भोयर यांनी दत्तक घेतलेल्या या गावातील विविध कामांचे लोकार्पण सोहळ्यास हजेरी लावतील. तसेच ७ वाजता घोराड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सत्कार कार्यक्रमात हजर राहणार असून आमदार डॉ. भोयर यांच्या विकास कामांचे उदघाटन नवनीत राणा यांच्या हस्ते होत आहे. माजी खासदार रामदास तडस हे प्रमुख पाहुणे आहेत.

आणखी वाचा-नागपूर : तंत्रस्नेही महिला अधिकाऱ्याच्या उपक्रमाला राज्यभर पसंती अन्…

दुसरीकडे आर्वी मतदारसंघात काँग्रेसतर्फे लढण्यास इच्छुक प्रिया शिंदे तोडसाम यांचा कार्यक्रम आहे. आर्वी येथील सहकार मंगल कार्यालयात प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम होणार. पाटील यांच्या नृत्याचे युवकांना आकर्षण आहे. म्हणून वर्धा जिल्ह्यात प्रथमच पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रिया शिंदे यांनी सांगितले. शिंदे या आर्वी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस तर्फे लढण्यास इच्छुक असून तसा अर्ज त्यांनी पक्षाकडे दिला आहे. अन्य महिला संभाव्य आहेतच. देवळीतून चारूलता टोकस यांनी मावसभाऊ व विद्यमान आमदार रणजित कांबळे यांच्याशी स्पर्धा करीत अर्ज दिला.

वर्धा मतदारसंघात जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष हेमलता मेघे यांचा अर्ज आहे. तसेच मूळ वर्धेकर असलेल्या अमरावती येथील प्रा. सुजाता सबाने झाडे यांचाही अर्ज आहे. त्या माजी आमदार माणिकराव सबाने यांच्या पुतणी होत. महाविद्यालयीन काळात त्या विद्यार्थी नेत्या म्हणून पुढे आल्या होत्या. हिंगणघाट येथून कामगार नेत्या अर्चना भोमले तसेच विजया पाटील यांचा अर्ज काँग्रेसकडे आला असल्याचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी सांगितले. संभाव्य अशा या महिला उमेदवार विविध उपक्रम घेण्यात आघाडीवर आहेत. गौतमी पाटील व नवनीत राणा आज दोन मतदारसंघात गाजवणार.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana on wardha visit today and gautami patils dance program in arvi constituency pmd 64 mrj