अमरावती : लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून पराभव झाल्‍यानंतर भाजपच्‍या नेत्‍या नवनीत राणा यांनी काही काळ मौन बाळगणे पसंत केले, पण आता पुन्‍हा त्‍यांनी जाहीर कार्यक्रमांमधून त्‍यांच्‍या विरोधकांविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे. बच्‍चू कडू आणि राणा दाम्‍पत्‍यातील राजकीय संघर्ष गेल्‍या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दोन वर्षांत तो अधिक टोकदार झाला आहे. नवनीत राणा यांनी अचलपूरचे आमदार बच्‍चू कडू यांना पराभवासाठी कारणीभूत ठरवत त्‍यांनी टीकेचे लक्ष्‍य केले आहे. बच्‍चू कडू यांचे गृहक्षेत्र असलेल्‍या परतवाडा येथे जाऊन नवनीत राणा यांनी बच्‍चू कडू यांना आव्‍हान दिले आहे. यावेळी धोकेबाजांना माफी मिळणार नाही, सर्व हिशेब चुकते केले जाणार आहेत, असा इशारा देतानाच बच्‍चू कडू हे सुपारी बहाद्दर, तोडीबाज नेते आहेत, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी रात्री परतवाडा येथे दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाला हैद्राबाद येथील आमदार टी. राजा सिंह, खासदार डॉ. अनिल बोंडे हे उपस्थित होते. नवनीत राणा म्‍हणाल्‍या, वीस वर्षात एकही उद्योग अचलपूर मतदारसंघात आला नाही. मंत्री असताना येथील फिनले मिल बंद पडली. ती सुद्धा त्यांना सुरू करता आली नाही. वीस वर्षांत भ्रष्टाचार करून सुपारी बहाद्दराने फक्त पैसे कमावले. एकाही व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून दिला नाही. पण स्वतःसाठी सात पिढ्यांच्या रोजगारांची व्यवस्था त्यांनी केली आहे, असा आरोप त्‍यांनी आमदार बच्‍चू कडू यांचे नाव न घेता केला. यावेळी सुपारी बहाद्दराला अचलपूर मतदार संघातून आऊट करणार की नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. कडू यांचा उल्लेख त्यांनी तोडी बहाद्दर, ब्लॅकमेलर, सुपारीबाज, ढोंगी, गारुडी असा केला.

हेही वाचा…लखपती दीदी, लाडकी बहीण खूप झाले, उमेदवारीचे बोला! राजकीय पक्षांवर…

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, मी मैदानात लोकसभा निवडणुकीच्‍या वेळीही होती आणि आताही आहे. त्‍यावेळी लोकसभेत अमरावती मतदार संघाचे प्रतिनिधित्‍व करण्‍यासाठी मी निवडणूक रिंगणात होते, पण आता बेईमान लोकांना हद्दपार करण्‍यासाठी मी मैदानात उतरले आहे. मी भगव्‍या झेंड्याच्‍या रक्षणासाठी सदैव लढणार आहे. जे लोक या झेंड्यासाठी लढताहेत, त्‍यांच्‍यासोबत अखेरच्‍या श्‍वासापर्यंत आपण सोबत राहू. नवनीत राणांनी स्वतः खासदार असताना केलेल्या कामांची यादी यावेळी वाचून दाखवली. आपल्‍या काळात जिल्ह्याच्या विकासात मोठी भर पडल्याचा दावा त्‍यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana targets bachchu kadu accuses him of corruption mma 73 psg