खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांवर बेछूट आणि चुकीचे आरोप करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालवला असून सत्तेतील लोकांना हाताशी धरून पोलिसांवर दबाव आणणे हे चुकीचे आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या सारख्या लोकप्रतिनिधींची दादागिरी महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असा इशारा कायदेतज्ज्ञ ॲड असीम सरोदे यांनी दिला आहे.
अॅड असीम सरोदे म्हणाले, ‘ कुणाची परवानगी न घेता त्यांच्या संभाषणाचे छायाचित्रण किंवा ध्वनिमुद्रण करणे चुकीचे असले, तरी यात कायद्याच्या दृष्टीने हेतू महत्वाचा ठरत असतो. खासदार नवनीत राणा यांचा आक्षेप बरोबर असला, तरी त्यांची सांगण्याची पद्धत दबावपूर्ण आहे. लोकप्रतिनिधी या पदाचा गैरवापर करणारी आहे. त्यांचा पुर्वेतिहास पाहता, त्यांनी यापुर्वीही पोलिसांवर चौकशीदरम्यान प्यायला पाणीही न दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत चहा पीत असल्याचे छायाचित्र सार्वत्रिक झाले होते.
हेही वाचा : बुलढाणा : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू
नवनीत राणा या पोलिसांवर बेछुट आणि चुकीचे आरोप करतात, त्यामुळेच स्वत:च्या बचावासाठी पोलिसांनी संभाषणचे चित्रिकरण किंवा ध्वनिमुद्रण केले असावे, असे सरोदे यांनी सांगितले.नवनीत राणा यांनी पोलिसांबद्दल अर्वाच्च आणि उर्मट भाषा वापरली. त्याबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आणि पोलिसांच्या पत्नींनी निषेध व्यक्त केला आहे. सर्व वकील हे त्यांच्या सोबत आहेत. सत्तेत असलेल्यांच्या निकटच्या म्हणून नवनीत राणा या पोलिसांवर दबाव आणत असतील, तर ते चुकीचे आहे. पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणे अत्यंत चुकीचे आहे, नवनीत राणांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे ॲड सरोदे म्हणाले.