अमरावती : गेल्‍या विधानसभा निवडणुकीत दर्यापूरमधून काँग्रेसचे बळवंत वानखडे यांनी भाजपचे उमेदवार रमेश बुंदिले यांचा पराभव करून ही जागा खेचून घेतली होती. पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. बळवंत वानखडे हे खासदार झाले. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्‍का सहन करणाऱ्या भाजपच्‍या नेत्‍या नवनीत राणा यांनी मात्र स्‍वस्‍थ न बसता आता दर्यापूरवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्‍या अनेक दिवसांपासून भाजपच्‍या नेत्‍या माजी खासदार नवनीत राणा यांचे दर्यापूर मतदारसंघात दौरे वाढल्‍याने शिवसेना शिंदे गटात मात्र अ‍स्‍वस्‍थता वाढली आहे. ‘दर्यापूर विधानसभा मतदारसंघात बाहेरचे पार्सल नको, कमळच हवे,’असे सांगत माजी खासदार नवनीत राणा यांनी माजी आमदार अभिजित अडसूळ यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्‍यातच गणेशोत्‍सव, नवरात्रौत्‍सव आणि आभार संवाद भेटीच्‍या कार्यक्रमांच्‍या निमित्‍ताने नवनीत राणा या सातत्‍याने दर्यापूर मतदारसंघांमध्‍ये लोकांच्‍या भेटी घेताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला नाही, तरी मतदारांनी आपल्‍याला साथ दिली. त्‍यांचे आभार मानने आपले कर्तव्‍य असल्‍याचे त्‍या सांगतात. पण, आता त्‍यांनी दर्यापूर आणि मेळघाट या दोन मतदारसंघांत भाजपचा झेंडा उंचावण्‍याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत. दर्यापूरची जागा पुन्‍हा भाजपला मिळवून देणार, असे त्‍यांनी जाहीर केले आहे. कार्यकर्त्‍यांच्‍या मेळाव्‍यात उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वात आपल्‍याला अमरावती जिल्‍हा हा भाजपमय करायचा आहे, असे ते सांगतात. पण, त्‍यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे.

हे ही वाचा…भारत राखीव बटालीयनमध्ये ३२६ पदे मंजूर; ‘या’ पदांचा समावेश

शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार अडसूळ हे दर्यापुरातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी दर्यापूरमधून विजय मिळविला होता. नंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत महायुतीत शिवसेनेला ही जागा सुटावी यासाठी आग्रही आहेत. पण, त्यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध होऊ लागला आहे.

नवनीत राणा यांनी दर्यापुरातील एका कार्यक्रमात अडसूळ यांच्यावर थेट टीका केली. मेळघाट आणि दर्यापुरात कमळ चिन्हावर उमेदवार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्‍यामुळे अडसूळ यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

हे ही वाचा…वर्धा : सुमित वानखेडेंच्या गरबा कार्यक्रमात दादाराव केचेंची गोची; अभिनेत्याच्या घोषणेमुळे…

अभिजीत अडसूळ यांची डोकेदुखी वाढवणाऱ्या या घडामोडी आहेत. दर्यापूर मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. नवनीत राणा या दर्यापूरमधून स्‍वत: लढण्‍यासाठी इच्‍छूक आहेत, की त्‍यांनी भाजपच्‍या अन्‍य उमेदवारासाठी मैदान मोकळे करण्‍याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत की कसे, हे अद्याप स्‍पष्‍ट केलेले नाही. मात्र त्‍यांची धावपळ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet ranas visits to daryapur constituency are causing unrest in shiv sena shinde faction mma 73 sud 02
Show comments