चंद्रपूर : नवरात्रोत्सवानिमित्त येथील ऐतिहासिक महाकाली मंदिरात विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश, तेलगंणातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आदिवासी गोंड राजाने बांधलेल्या किल्ल्याच्या परकोटावर नतमस्तक होऊन भाविक माता महाकालीचे दर्शन घेत आहेत. यंदा पहिल्यांदाच येथे माता महाकाली महोत्सव साजरा होत आहे. यामुळे मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरत आहे.
महाकाली मंदिराबाबत दोन आख्यायिका प्रसिद्ध
गोंडराजा खांडक्या बल्लाळशाह शिकारीच्या निमित्ताने या परिसरातील जंगलात फिरत होता. फिरता फिरता तो देवीच्या या मूळ गुफेकडे आला. तेथील पाण्याने चेहऱ्यावरील व्रण साफ केले असता, ते नाहीसे झाले. पुढे त्याला स्वत: महाकालीने दृष्टांत दिला. स्वत:चे स्थान सांगितले. दुसऱ्याच दिवशी राजाने जंगलातील भुयारी मार्ग शोधून गुफा मोकळी केली. त्यामुध्ये देवीची कोरीव मूर्ती सापडली. राजाने तेथे छोटेखानी मंदिर बांधले, अशी एक आख्यायिका आहे.
हेही वाचा : आदिमाया रेणुका मातेच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र माहूरगडावर भाविकांची अलोट गर्दी
दुसऱ्या आख्यायिकेनुसार, आजच्या मंदिराची निर्मिती ही राणी हिराईने १७ व्या शतकात केली. १७०७ ते १७०९ हा या मंदिराच्या उभारणीचा काळ. देवगडचा राजा दुर्गशाह व गोंडराजा वीरशाह (बिरसिंग) यांच्यात लढाई झाली होती. वीरशाहचा पाडाव होऊ लागला होता. अचानक ‘जय महाकाली’चा जयघोष झाला आणि वीरशाहाच्या सैन्यात चैतन्य संचारले. युद्धात राजा वीरशाहचा विजय झाला. महाकालीच्या कृपेनेच लढाईत विजय झाल्याचा राणी हिराईचा दृढ समज झाला. या कृतज्ञतेतून तिने मंदिराचा कायापालट केल्याची अख्यायिका सांगितली जाते.