लोकसत्ता टीम
गडचिरोली : दहा लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल दाम्पत्याने गडचिरोली पोलिसांसमोर १४ ऑक्टोबरला आत्मसमर्पण केले. हिंसक नक्षल चळवळीत ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व प्रेमाचा प्रवास लग्नबंधनापर्यंत पोहोचला. मात्र, नक्षल चळवळीत वैवाहिक आयुष्य जगता येत नसल्याने नऊ वर्षांनंतर त्यांनी आत्मसमर्पणाची वाट निवडली. अनेक हिंसक कारवायांत सक्रिय सहभाग असलेल्या या दाम्पत्याच्या शरणागतीने नक्षल्यांना मोठा हादरा बसला आहे.
वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु (२७, रा. पिडमिली, ता. चिंतागुफा, जि. सुकमा (छत्तीसगड) व त्याची पत्नी रोशनी विज्या वाचामी(२४ , रा. मल्लमपोड्डुर, ता. भामरागड) असे या जहाल माओवादी दाम्पत्याचे नाव आहे. वरुण हा भामरागड दलममध्ये कमांडर पदावर तर रोशनी ही याच दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. वरुण हा २०१५ मध्ये कोंटा एरियामध्ये सदस्य पदावर भरती झाला. २०२० पर्यंत तो दंडकारण्यमधील स्पेशल झोनल कमिटी सदस्य गिरीधर तुमरेटी याचा अंगरक्षक म्हणून कार्यरत होता. २०२० ते २०२२ मध्ये तो भामरागडमध्ये उपकमांडरपदी पदोन्नतीवर गेला. २०२२ पासून तो भामरागड दलममध्ये उपकमांडर म्हणून कार्यरत होता. त्याने कार्यकाळात १५ गुन्हे केले असून यात १० चकमकीसह इतर ५ गुन्ह्यांचा समावेश आहे.
आणखी वाचा-गडचिरोलीत कोट्यवधींचा धान बोनस घोटाळा?… भूमिहीन व्यक्तींच्या खात्यावर…
रोशनी वाचामी ही २०१५ मध्ये राही दलममध्ये भरती होऊन सदस्य पदावर कार्यरत झाली. २०१६ मध्ये तिची भामरागड दलममध्ये बदली झाली. २०१७ मध्ये ती अहेरी दलममध्ये बदली होऊन गेली. २०१९ मध्ये ती पुन्हा भामरागड दलममध्ये सक्रिय झाली. पुढे एक वर्षे ती गट्टा दलममध्ये होती. २०२२ मध्ये ती पुन्हा भामरागड दलममध्ये बदली होऊन पार्टी सदस्य पदावर कार्यरत होती. तिने २३ गुन्हे केले. त्यात १३ चकमकी व इतर १० गुन्हे केल्याची नोंद आहे. गेल्या काही वर्षात अनेक मोठ्या नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग निवडल्याने नक्षल चळवळ खिळखिळी झाल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा-Maharashtra elections 2024 : अमरावती : विधानसभा निवडणूक! भाजपची पाच जागांवर अडचण…
दोन वर्षात २७ जणांचे आत्मसमर्पण
पोलिसांनी माओवादविरोधी अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची संधी दिल्याने २०२२ ते २०२४ या दरम्यान २७ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कमांडंट दाओ इंजिरकान किंडो यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पाडली.