श्रीधरच्या बाबतीत नक्षलवाद्यांना झाली उपरती
जिवंत असेपर्यंत आमचा काहीही संबंध नाही, अशी भूमिका घेणाऱ्या नक्षलवाद्यांनी आता श्रीधर श्रीनिवासनच्या मृत्यूनंतर मात्र तो चळवळीच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता, अशी कबुली देणारे पत्रक जारी केले असून, यामुळे या चळवळीचा दुटप्पीपणा आणखी उघड झाला आहे.
मूळचा मुंबईचा असलेल्या श्रीधर श्रीनिवासनचे गेल्या १८ ऑगस्टला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पोलीस दफ्तरी जहाल नक्षलवादी, अशी नोंद असलेल्या श्रीधरच्या निधनाची माहिती पोलिसांना या पत्रकामुळेच समजली. आधी मुंबईत विद्यार्थी संघटनेत सक्रिय असलेला श्रीधर १९९० ला विदर्भात दाखल झाला. नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्य़ातील नक्षल कारवायात सक्रिय असलेल्या श्रीधरवर नंतर गोंदिया-बालाघाट विभागाची जबाबदारी देण्यात आली. शेवटच्या टप्प्यात त्याला नक्षलवाद्यांच्या राज्य समितीचा सचिव नेमण्यात आले. याच काळात तो केंद्रीय समितीचा सदस्य होता, अशी कबुली नक्षलवाद्यांनी आता त्याच्या निधनानंतर जारी केलेल्या पत्रकातून दिली आहे. श्रीधरवर विदर्भातील विविध पोलीस ठाण्यात ६० पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. २००७ ला त्याला अटक करण्यात आली. २०१३ मध्ये उच्च न्यायालयाने त्याला ठोठावलेल्या सात वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. ही शिक्षा आधीच भोगून झालेली असल्याने तो लगेच सुटला.
याच काळात नक्षलवाद्यांनी वारंवार पत्रके काढून श्रीधरचा चळवळीशी संबंध नाही. पोलिसांनी त्याला नाहक गोवले असून, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी भूमिका घेतली होती. स्वत: श्रीधरने सुद्धा न्यायालयात बचाव करताना चळवळीशी काहीही संबंध नाही. मी कामगारांच्या व दलित, शोषितांच्या हक्कासाठी लढणारा कार्यकर्ता आहे, अशी भूमिका घेतली होती. तुरुंगातून सुटल्यावर पत्रकारांशी बोलताना सुद्धा श्रीधरने याच भूमिकेची री ओढली होती. आता त्याच्या निधनानंतर मात्र नक्षलवाद्यांनी श्रीधर चळवळीचा अविभाज्य घटक होता व त्याच्या निधनाने मोठी हानी झाली आहे, अशी कबुली देऊन दु:ख व्यक्त केले आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर श्रीधर मुंबईला निघून गेला. मात्र, त्याचे निधन नेमके कुठे झाले, याविषयी पोलीस संभ्रमात आहेत. नक्षलवाद्यांच्या पत्रकात श्रीधर त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी जात असताना मरण पावला, असे नमूद केले असले तरी त्यात ठिकाणाचा उल्लेख नाही. गुप्तचर खात्यातील सूत्रानुसार श्रीधरने तुरुंगातून सुटल्यानंतर दोन वर्षे मुंबईत काढली. गेल्या ऑगस्टमध्ये तो नक्षलवाद्यांचा गड असलेल्या अबूजमाड परिसरात जाण्यासाठी निघाला. वाटेतच त्याला हृदयविकाराचा झटका आला व त्यात तो मरण पावला, असे या सूत्रांचे म्हणणे आहे. श्रीधरची पत्नी सीमा हिराणी मुंबईत असून तिच्यावर सुद्धा नक्षलवादी असल्याचा आरोप आहे. एकूणच या कबुलीमुळे नक्षलवाद्यांच्या कार्यपद्धतीचा आणखी एक पैलू समोर आला आहे.
जिवंतपणी नकोसा मृत्यूनंतर मात्र हवासा
मूळचा मुंबईचा असलेल्या श्रीधर श्रीनिवासनचे गेल्या १८ ऑगस्टला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 28-09-2015 at 04:05 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxal remember sridhar srinivasan