गोंदिया: दरवर्षी २ ते ८ डिसेंबर दरम्यान नक्षलवादी पीएलजीए सप्ताह पाळतात. या दरम्यान नक्षलप्रभावित भागात नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ होते. मात्र मागील सात ते आठ वर्षांत एकही मोठी घटना घडलेली नाही. गोंदिया जिल्ह्यात नक्षल सप्ताहाला पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला आहे. जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे ६ दलम कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये देवरी दलम , सालेकसा दलम, तांडा दलम, कोरची व कुरखेडा दलमचा समावेश आहे. नक्षलवादी गोंदिया जिल्ह्यातील जंगलांचा उपयोग रेस्ट झोन म्हणून करीत असल्याचे आतापर्यंतच्या उपयोग वरून दिसून येते. लगतच्या गडचिरोली व बालाघाट ( मध्यप्रदेश), छत्तीसगडच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी कारवाया फार कमी आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, दरेकसा, तसेच देवरी तालुक्यातील ककोडी, चिचगड या दाट जंगल परिसरात अधूनमधून नक्षलवादी कारवाया होत असतात. मात्र पीएलजीए सप्ताहादरम्यान या भागातील नागरिकांमध्ये थोड्या फार प्रमाणात भीतीचे वातावरण असते. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षल प्रभावित भागातील पोलिसांना व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सरत्या वर्षात अवकाशात फिरत्या चांदणीची पर्वणी

सीपीआय माओवादी संघटनेच्या नक्षलवाद्यांकडून २ ते ८ डिसेंबर दरम्यान पीएलजीए सप्ताह स्थापना दिवस म्हणून नक्षलवादी साजरा करतात. या सप्ताहात नक्षलवाद्यांकडून घातपाताचे कृत्य होऊ नये, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. या सप्ताहात नक्षलवादी घातपाताचे कृत्य करतात. महत्त्वाच्या व्यक्तीचे अपहरण, खून, जाळपोळ यांसारखे गंभीर गुन्हे करून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. या कालावधीत नक्षलवादी आक्रमक भूमिका घेऊन अटकेतील नक्षलवाद्यांना पळवून नेण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. पीएलजीए सप्ताहाच्या काळात नक्षलवाद्यांकडून घडवून आणल्या जाणाऱ्या हिंसक कृत्यांना आळा घालण्यासाठी १० डिसेंबर पर्यंत पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

खबरदारी…एसटी महामंडळाचा सावध पवित्रा

नक्षल्यांनी पुकारलेल्या सप्ताहा दरम्यान काळी- पिवळी टॅक्सी व ऑटो रिक्षाची वाहतूक पूर्णपणे बंद असते. याचा परिणाम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळावर ही होतो. या सप्ताहा दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून गोंदिया एस टी आगाराने काही संवेदनशील जंगल मार्गावरील बसेस बंद केल्या आहेत. यात गोंदिया ते चांदसूरज, बंजारी, खोलगड, बिजेपार या गावांतील प्रवाशांना सप्ताहादरम्यान बससेवे पासून वंचित राहावे लागणार आहे. नक्षलप्रभावित भागातील जांभडी बस गोरेगाव येथे, तर डोमाटोला बसचा थांवा बिजेपार पोलिस चौकीत पोलिस संरक्षणात असणार आहे.

हेही वाचा : दोन मुलांना शाळेत सोडताना तीन हेल्मेट हाताळायचे कसे? संतप्त महिला पालकांचा सवाल

सी-६० ची तुकडी तैनात

गोंदिया जिल्ह्यातील सीमेवरील ११ सशस्त्र दूरक्षेत्रात सी -६० च्या जवानांची तुकडी सुरक्षे करिता तैनात करण्यात आली आहे तसेच जिल्ह्याला एक एसआरपीची तुकडी पण मिळाली आहे. या सर्वांना संवेदनशील क्षेत्रात लावून २४ तास चोख बंदोबस्त राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या मार्गावरील येना जाणाऱ्या वाहनांची तपासणी पण या सुरक्षा पथकांद्वारे केली जात असल्याची माहिती गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी लोकसत्ता सोबत बोलताना दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxal saptah gondia district police preparation to tackle naxalites sar 75 css