सध्या चलनकल्लोळाचा फटका बसल्याची नवी नवी उदाहरणे समोर येत आहेत. हजार व पाचशेच्या नोटा रद्द झाल्याने बँकांसमोरच्या रांगा वाढतच चालल्या आहेत. शहरी भागातील या अस्वस्थतेला माध्यमातून वाचाही फुटत आहे, पण दुर्गम भागातल्या लोकांचे काय? त्यांना होणाऱ्या त्रासाची दखल कोण घेणार? यासारखे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत बँक व टपाल कार्यालयांचे जाळेच नाही. तेथे राहणारा आदिवासी त्याच्या पुरचुंडीत साठवून ठेवलेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी रोज तीस ते पस्तीस किलोमीटरची पायपीट करतो आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा दुहेरी फटका या आदिवासीला बसतो आहे. याच भागात नक्षलवाद्यांचा वावर आहे. जंगलात राहून गनिमी युद्ध करत सरकार नावाच्या यंत्रणेशी लढणारी ही चळवळ या चलन तुटवडय़ामुळे मेटाकुटीला आली आहे. खंडणीच्या माध्यमातून दरवर्षी कोटय़वधी रुपये गोळा करणारे नक्षलवादी त्यांचा सारा पैसा आजवर जंगलात गाडून ठेवत आले आहेत. कोटय़वधीची ही रक्कम आता नव्या चलनात बदलून घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी पुन्हा आदिवासींनाच वेठीस धरणे सुरू केले आहे. परवा भामरागड भागात नक्षलवाद्यांनी एक बैठक घेतली. त्यात नोटा बदलून आणण्याची जबाबदारी उपस्थितांवर टाकण्यात आली. हे काम म्हणजे चळवळीला मदत आहे, हे लक्षात ठेवा. जो हे करणार नाही, त्याला वर्गशत्रू ठरवून ठार मारले जाईल, असा दमही नक्षलवाद्यांनी या बैठकीतून दिला. त्यामुळे या भागात राहणाऱ्या आदिवासींवर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. त्याला स्वत:च्या घरातील नोटा बदलून घ्यायच्या आहेतच, शिवाय नक्षलवाद्यांनी दिलेला पैसा आधी बँकेत टाकून व नंतर परत तो काढून त्यांच्या हवाली करायचा आहे. हे करताना पुन्हा पोलिसांची नजर चुकवणे आलेच. नोटा बदलण्यासाठी कामात येणाऱ्या या आदिवासींना कोणताही त्रास होऊ नये म्हणून नक्षलवाद्यांनी प्रत्येकाकडे छोटी रक्कम देण्याचे धोरण ठेवले आहे. ज्यांना रक्कम द्यायची आहे, अशांच्या नावांची यादी तयार करणे, जुन्या नोटांचे वितरण, नवी नोट परत मिळवणे या कामात नक्षलवाद्यांची सारी यंत्रणा आता वेगाने कामाला लागली आहे. जंगलात चालणाऱ्या या घडामोडीपासून पोलीस पूर्णपणे अनभिज्ञ आहेत असेही नाही. गुप्तचर यंत्रणांकडून त्यांनाही अशा बैठकांच्या बातम्या मिळू लागल्या आहेत. मात्र पोलीस यंत्रणेकडून अजून तरी सक्ती दाखवण्यात आलेली नाही. ती दाखवायला सुद्धा नको, कारण यात मरण पुन्हा आदिवासींचेच आहे. या आदिवासींना नक्षलवाद्यांना ‘नाही’ म्हणता येत नाही. नकाराचे उत्तर बंदुकीची गोळी आहे हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे त्यांचाही नाईलाज आहे. नोटा बघून मोहात पडणे हा तसा मानवी स्वभावाचा भाग. भल्याभल्यांना हा मोह टाळता येत नाही. जंगलातल्या गरीब आदिवासीला हा मोहही करता येत नाही. जास्तीचे पैसे बघून मन चंचल होऊ देता येत नाही. कारण गाठ नक्षलवाद्यांशी आहे हे त्यांना पक्के ठाऊक आहे. अनेकदा आदिवासींना नक्षलवादी पैसे गाडून ठेवतात, ती ठिकाणे ठाऊक असतात. आजवर आयुष्यात मोठय़ा संख्येत न बघितलेल्या नोटा अमूक ठिकाणी आहेत हे त्याला ठाऊक असते, पण त्या बाहेर काढाव्यात, पैसे घेऊन पळून जावे असा विचार तो स्वप्नातही करू शकत नाही. एकटय़ा गडचिरोलीचाच विचार केला तर नक्षलवाद्यांचे पैसे पळवून नेण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. मात्र हे करणारे त्यांच्या चळवळीतलेच जास्त निघाले. प्रामुख्याने आत्मसमर्पण करणारे नक्षलवादी बाहेर पडताना पैसा पळवून नेतात. चळवळीत मोठय़ा हुद्यावर काम करणाऱ्या नक्षलवाद्याला शरण जायचे असेल तर तो हमखास पैशावर हात मारतो. पैसा पळवून नेणाऱ्या अशा सहकाऱ्यांच्या बाबतीत चरफडत बसणे हा एकच पर्याय नक्षलवाद्यांसमोर उरतो. अशा शरणग्रस्तांचा बदला घेण्याचे काम नंतर नक्षलवाद्यांकडून केले जाते. हा सारा घटनाक्रम आदिवासींच्या डोळ्यासमोर घडतो पण त्याला चूप बसावे लागते. शरण गेलेल्या आपल्याच सहकाऱ्याने पैसा पळवून नेला अशी कबुलीही नक्षलवाद्यांना उघडपणे देता येत नाही. तशी ती दिली तर चळवळीच्या तत्त्वाचा पराभव ठरतो. आपल्या सहकाऱ्यांचा चोरटेपणा दडवून ठेवणारे नक्षलवादी एखाद्या आदिवासीने असे पैसे पळवण्याचे कृत्य केले तर मात्र कर्तव्यकठोर होतात व संबंधिताला जाहीरपणे कठोर शिक्षा दिली जाते. चळवळीच्या प्रभावक्षेत्रावर आमची सत्ता आहे, येथे अंतिम शब्द आमचाच असेल असा अविर्भाव ही शिक्षा देताना असतो. गेल्या तीन दशकात चळवळीबाहेरच्या काहींनी नक्षलवाद्यांच्या तिजोरीत हात घालण्याचा प्रकार केला. त्याची त्यांना जबर शिक्षा मिळाली. हे पूर्वानुभवाचे संचित जवळ बाळगून असलेला अबोल आदिवासी म्हणून आजच्या चलनकल्लोळातही चूप आहे. नक्षलवाद्यांनी सांगितले तेवढे करायचे व शांत बसायचे एवढेच त्याच्या हाती आहे. तसे करण्यावाचून त्याला इलाजही नाही. सध्याच्या चलनप्रकरणात इमानेइतबारे कर भरणारे रांगेत उभे असताना आणि काळा पैसा दडवणारे पांढरा करण्याच्या काळजीत असताना जंगलातील आदिवासीला मात्र चलन बदलाची प्रक्रियाही दहशतीत पार पाडावी लागत आहे. हेच या गरिबांचे प्राक्तन आहे.

देवेंद्र गावंडे

devendra.gawande@expressindia.com