भीतीपोटी कोरचीत एकही अर्ज नाही, पालीस दक्ष
गडचिरोली जिल्ह्य़ात होणाऱ्या ९ नगर पंचायतींच्या निवडणुकीवर नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराचे सावट आहे. ही निवडणूक अतिशय शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांसमोर कडवे आव्हान आहे. त्या दृष्टीने जिल्हा पोलिस दल आतापासूनच कामाला लागले आहेत. दरम्यान, नक्षलवाद्यांच्या भीतीने कोरचीत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.
गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्य़ात १ व ६ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये ही निवडणूक होत आहे. चामोर्शी, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, भामरागड नगर पंचायतींची निवडणूक १, तर तर कुरखेडा, कोरची व धानोरा नगर पंचायतीची निवडणूक ६ नोव्हेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या जिल्ह्य़ातील नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी, तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या तिसऱ्या दिवशी ८ नगर पंचायतींमध्ये ४७६ अर्ज दाखल करण्यात आली आहेत. मात्र, कोरची येथे आज एकाही उमेदवाराने ते दाखल केलेले नाही. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १ ऑक्टोबरपासून अर्ज भरावयास सुरुवात झाली असून ८ ऑक्टोबर ही अखेरची तारीख होती. कालपर्यंत मुलचेरा येथे एकाही उमेदवाराने अर्ज सादर केलेला नव्हता. मात्र, काल अखेरच्या दिवशी तेथे ४५, भामरागडमध्ये ३६, सिरोंचात ५३, अहेरीत १४१, एटापल्लीत ९९, चार्मोशीत ८७ अर्ज सादर करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज विक्री व ते सादर करणे सुरू झाले आहे. त्यांच्यासाठी अखेरची तारीख १२ ऑक्टोबर आहे. धानोरा नगर पंचायतीसाठी आज ५, तर कुरखेडय़ात १० अर्ज सादर करण्यात आले. मात्र, नक्षलवाद्यांच्या भीतीने कोरचीत एकानेही अर्ज सादर केलेला नाही. कोरची वगळता उर्वरित ८ नगर पंचायतींमध्ये आज ४७६ उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. आतापर्यंत सर्व नगर पंचायतींमध्ये ७४३ अर्ज सादर करण्यात आल्याची माहिती नगर प्रशासन विभागाने दिली. आतापयर्ंत अहेरीत सर्वाधिक १७३, तर त्या खालोखाल चामोर्शी नगर पंचायतीसाठी १६९ अर्ज सादर करण्यात आले आहे. एटापल्ली या दुर्गम व नक्षलग्रस्त नगर पंचायतीतही १२५ अर्ज सादर करण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे अनेकांनी अर्जच दाखल केलेले नाहीत. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, धानोरा व कोरची या नगर पंचायतींमध्ये निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी पोलिसांना कडक बंदोबस्त तैनात करावा लागणार आहे. कारण, याच पाच तालुक्यांमध्ये नक्षलवाद्यांची पाळेमुळे खोलवर रुजलेली असल्याने तेथे नक्षलवादी हिंसाचार घडवून आणतील, हे पोलिसांनाही माहिती आहे. त्यांमुळेच गडचिरोली पोलिसांनी आतापासूनच बंदोबस्तावर लक्ष केंद्रित केले आहे.

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या
पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी शंकर वड्डे (२५) या युवकाची काल, गुरुवारी रात्री भामरागड तालुक्यातील मलमपोडूर येथे गळा चिरून हत्या केली. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास १५-२० सशस्त्र नक्षलवादी शंकरच्या घरी गेले. यावेळी झोपेत असलेल्या शंकरला उठवून गावाबाहेर नेऊन तेथेच त्याची गळा चिरून हत्या केली. आज सकाळी मलमपोडूरनजीकच्या रस्त्यावर शंकरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. येत्या एक नोव्हेंबरला नगर पंचायतीच्या निवडणुका होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ही हत्या झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Story img Loader