गडचिरोली : केंद्र सरकारने देशातून नक्षलवाद हद्दपार करण्यासाठी मोठी पावले उचलली आहे. त्यामुळे छत्तीसगड पाठोपाठ महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात देखील ही चळवळ शेवटची घटका मोजत असल्याचे राजकीय नेत्यांकडून वेळोवेळी सांगण्यात येते. गेल्या साडेचार वर्षात गडचिरोली पोलिसांनी शेकडो नक्षलवाद्यांना ठार केले. मात्र, यात त्यांना कोणतेही नुकसान झालेले नव्हते. परंतु भामरागड तालुक्यातील फुलणार जंगल परिसरात ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० या विशेष पथकाचे जवान महेश नागुलवार शहीद झाल्याने संपुष्टात येत असलेली नक्षलवादी चळवळ पुन्हा सक्रिय होणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
चार दशकापासून गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेल्या हिंसक नक्षलवादी चळवळीची मागील काही वर्षांपासून पीछेहाट झाली आहे. या काळात झालेल्या चकमकीत मोठ्या नेत्यांसह शेकडो नक्षलवादी मारल्या गेले. दुसऱ्या बाजूला छत्तीसगडमध्ये देखील नक्षलवाद्यांच्या विरोधात आक्रमक कारवाया सुरु आहे. त्यामुळे नक्षलवादी दोन्ही बाजुनी कोंडीत सापडले आहे. मधल्या काळात मोठे नेते ठार झाले. अनेकांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला.
भरती बंद झाल्याने ही चळवळ नेतृत्वहीन झाली आहे. तरीही अधूनमधून पोलीस-नक्षल चकमकी होत असतात. अशा परिस्थितीत गडचिरोली पोलिसांनी प्रभावी नियोजनाच्या बळावर पाच वर्षांपासून नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवले आहे. उत्तर गाडचिरोलीतील नक्षलवादी संपुष्टात आला आहे. दक्षिण गडचिरोलीत केवळ ४६ नक्षलवादी शिल्लक आहेत. त्यामुळे गेल्या साडेचार वर्षात गडचिरोली पोलीस दलातील एकही जवान शहीद झालेला नव्हता. परंतु काल भामरागड तालुक्यात झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. त्यामुळे पुन्हा नक्षलवादी सक्रिय होणार काय, अशी चर्चा यनिमित्ताने सुरु झाली आहे.
छत्तीसगडमधून गडचिरोलीत प्रवेश
नक्षलवाद्यांविरोधात छत्तीसगडमध्ये सुरु असलेल्या आक्रमक कारवायांमुळे दोन वर्षात ३०० हून अधिक नक्षलवादी ठार झाले आहे. मधल्या काळात नक्षल्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाडमध्येही पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. त्यामुळे घाबरलेले नक्षलवादी सुरक्षित स्थळाच्या शोधात लागून असलेल्या गडचिरोलीच्या घनदाट जंगलात आश्रय घेत आहेत. भामरागड तालुक्यातील कोपर्शी, फुलणार जंगल परिसर देखील छत्तीसगड सीमेला लागून आहे. हा भाग घनदाट जंगलाने वेढलेला असलेल्याने येथे नक्षलविरोधी अभियान राबवणे कठीण आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत गडचिरोलीच्या जवानांनी नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त केला. मात्र, यात एक जवान शहीद झाला.