नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या परखड भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून कामचुकार अधिकाऱ्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेकांना सरळही केले आहे. नागपूर येथील वनामतीच्या सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान गडकरींनी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील असाच एक प्रसंग सांगत चुकून राजकारणात आलो नाहीतर तरुण वयात नक्षलवादी चळवळीतच गेलो असतो, असे विधान केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या.

नेमके काय म्हणाले गडकरी?

राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मेळघाटात कुपोषणाचा प्रश्न गंभीर होता. यावेळी वनविभागाचे अधिकारी रस्ते बांधकामास परवानगी देत नव्हते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींनी बैठक घेतल्यावरही अधिकारी तयार झाले नाही. शेवटी हा प्रश्न माझ्या पद्धतीने मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आणि सर्व अधिकाऱ्यांना बजावून सांगितले, ‘‘मी चुकून राजकारणात आलो, नाहीतर माझ्या तरुण वयात नक्षलवादी चळवळीतच गेलो असतो. तुमचा असाच हट्ट असेल तर पुन्हा एकदा तिकडे जाऊन तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही’’, असा धाक दिल्यावर सगळे रस्ते पूर्ण करता आले, अशा प्रसंगाची आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाषणादरम्यान सांगितली.

हेही वाचा – पोलीस ठाण्यात पोलिसांना मारहाण, वादग्रस्त भाजप नेते मुन्ना यादव व त्यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल

महात्मा गांधींनी सांगितले गरिबांसाठी कायदा तोडा

अरुण बोंगीरवार फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘अरुण बोंगीरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड २०२४’ या पुरस्कार सोहळ्यादरम्यान गडकरी बोलत होते. यावेळी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुंबईच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, पुणे येथील उपजिल्हाधिकारी सरिता नरके यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, लता बाेंगिलवार आदींची उपस्थिती होती. गडकरी पुढे म्हणाले, गरीबांच्या हितासाठी कायदा तोडावा लागला तर त्यात गैर नाही असे महात्मा गांधींनी सांगितले होते. मात्र, स्वत:च्या किंवा दुसऱ्याच्या फायद्यासाठी कायदा तोडू नको असे ते म्हणत. त्या काळात कुपोषणामुळे मेळघाटमध्ये अनेक मुले मृत्युमूखी पडली. वनविभागाचे अधिकारी रस्तेच बांधू देत नव्हते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र, त्यानंतरही कुणी ऐकायला तयार नव्हते. शेवटी मला धाक दाखवून सर्व रस्त्यांचे काम करून घ्यावे लागले असेही गडकरी म्हणाले.

हेही वाचा – यवतमाळ: पोहरादेवीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बंजारा समाजाचा अपमान; माणिकराव ठाकरे यांची टीका

अधिकाऱ्यांमुळे कंत्राटदारांचे कोट्यवधींचे नुकसान

अनेक सरकारी अधिकारी सहा महिने महत्त्वाच्या नस्तीवर स्वाक्षरीच करत नाही. यामुळे अनेक कंत्राटदारांचे कोट्यवधींचे नुकसानही होते. मात्र अरुण बोंगिरवार हे वेळ पाळणारे अधिकारी होते. वेळेचे नियोजन करून समाज हिताच्या कामाला महत्त्व देणारे ते अधिकारी होते. त्यामुळे आजच्या पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा असेही आवाहन केले. यावेळी त्यांनी बोंगिलवार यांच्या कार्याचा गौरव करताना चांगले सचिव हे मंत्र्याच्या कार्याला दिशा देतात. त्यामुळे बोंगिलवारांसारखे कर्तव्यदक्ष आणि निर्णयक्षम अधिकारी घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.