गडचिरोली : मे महिन्यात छत्तीसगडच्या अबुझमाड परिसरात झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या नावावर काही सामान्य नागरिकांना ठार मारले, असा गंभीर आरोप नक्षलवादी संघटनेचा पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास याने पात्रकातून केला आहे.छत्तीसगडसह महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवायांचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अबुझमाडच्या विस्तीर्ण जंगलात पाच महिन्यांत १०७ नक्षलवाद्यांचा छत्तीसगड पोलिसांनी खात्मा केला. अबुझमाड हा नक्षलवाद्यांचा गड आहे.
हेही वाचा >>> आरोग्यसेवक, ग्रामसेवक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा
गडचिरोली पोलिसांची नक्षलविरोधी मोहीम, कम्युनिटी पोलिसींग यामुळे नक्षल चळवळीला हादरे बसले. अनेक नक्षलवादी नेते चकमकीत ठार झाल्याने जिल्ह्यात ही हिंसक चळवळ काहीशी कमकुवत झाली आहे. मात्र, छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या कुरापती सुरूच असतात. तेथे नक्षलवाद्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे तेथील पोलिसांनीही नक्षलविरोधी अभियान गतिमान केले आहे.
या पार्श्वभूमीवर नक्षलवादी संघटनेचा पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास याने एक पत्रक जारी करून छत्तीसगड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. वन्यप्राण्यांच्या दहशतीत आदिवासी वर्षानुवर्षे जंगलात राहतात. मात्र, नक्षलवादी ठरवून निरपराध लोकांचा बळी घेतला जात आहे, असा आरोप त्याने केला आहे. याविरुद्ध जनआंदोलनाचीही हाक त्याने दिली आहे. या पत्रकात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा येथे १३ मे रोजी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचाही उल्लेख आहे.
हेही वाचा >>> नागपूर, वर्धेत स्मार्ट प्रीपेड मीटर्स बसवणे सुरू; ग्राहकांच्या मनस्तापाचे…
पत्रकातील आरोप
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्याच्या काकूर-टेकामेट्टा जंगलात पारंपरिक पूजापाठ करण्यासाठी काही महिला गेल्या होत्या. गावकऱ्यांसमोर या जंलगात चार युवकांना पोलिसांनी गोळ्या झाडून संपविले. याच परिसरात त्याच दिवशी सहा जणांना ठार केले. १० मे रोजी बिजापूरच्या जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या गावातील १२ जणांना घेरले व गोळ्या झाडून संपविले, असे गंभीर आरोप या पत्रकात करण्यात आले आहेत. या पत्रकाबद्दल माहिती नाही. ते पत्रक पाहण्यात आले नाही. मी सध्या सुटीवर आहे, त्यामुळे याबद्दल मला अधिक सांगता येणार नाही. – सुंदरराज पत्तीलिंगम, विशेष पोलीस महानिरीक्षक, बस्तर, छत्तीसगड.