गडचिरोली : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील रहिवासी असलेला नक्षल्यांचा जहाल नेता तथा केंद्रीय समितीचा सदस्य आणि पश्चिम घाटचा कमांडर संजय राव उर्फ दीपक (५९) आणि त्याची पत्नी मुरुवपल्ली रजी उर्फ सरस्वती हिला अटक करण्यात तेलंगणा पोलिसांना यश आले आहे.
बीटेक केलेला संजय आणि त्याची पत्नी उच्च शिक्षित असून त्यांच्यावर २ कोटींपेक्षा अधिक बक्षीस होते. तो हैद्राबाद येथून अबुझमाडमध्ये एका महत्त्वाच्या बैठकीसाठी जाण्याच्या तयारीत होता. दोघांच्या अटकेने नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसल्याचे बोलल्या जात आहे.
हेही वाचा – व्हॉट्सअॅपवर मिळाली पतीच्या मृत्यूची माहिती; कारने ई-रिक्षा चालकाला उडविले
१९८३ साली जम्मू काश्मीरमधून संजय रावने ‘बीटेक’ केले. यादरम्यान त्याचे स्वतंत्र काश्मिरची मागणी करणाऱ्या फुटीरवाद्यांसोबत संबंध आले. वडील डाव्या कामगार चळवळीचे नेते असल्याने त्याला घरातूनच डाव्या विचारांचे बाळकडू मिळाले होते. त्यामुळे शिक्षणानंतर तो ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’च्या विविध पदांवर कार्यरत होता. दरम्यान १९९९ साली नक्षलवाद्यांचा नेता तसेच केंद्रीय समितीचा सदस्य कोनाथ मुरलीधरन उर्फ अजित याने ‘नक्षलबारी’ गटाची स्थापना केली. यातून प्रभावित होऊन संजयनेदेखील मुरलीधरनची साथ देण्याचे ठरविले. त्याला या गटाचा महाराष्ट्र प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासून तो महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि तमिळनाडू राज्यात विविध पदांवर कार्यरत होता. याकाळात त्याने अनेक हिंसक कारवाया घडवून आणल्या. तो मुंबई, पुणे, हैद्राबाद येथे नेहमी यायचा. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. यादरम्यान त्याला धुळे, बंगळुरू आणि २०१५ मध्ये पुण्यातील तळेगाव दाभाडे येथून अटकदेखील करण्यात आली होती. मात्र, जामिनावर सुटका होताच तो पुन्हा सक्रिय व्हायचा.
तब्बल तीस वर्षे कथित नक्षलवादी चळवळीत कार्यरत संजय नक्षलवाद्यांच्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या केंद्रीय समितीचा सदस्य असून त्याच्याकडे सद्या पश्चिम घाटच्या कमांडर पदाची जबाबदारी आहे. तर त्याची पत्नी मुरुवपल्ली रजी उर्फ सरस्वती ही १९९९ मध्ये नक्षल चळवळीत सहभागी झाली. २००७ मध्ये संजय आणि तिचे लग्न झाले. तीदेखील नक्षल्यांच्या पश्चिम घाट समितीची सदस्य आहे. सत्यसाई जिल्ह्याच्या पुटपर्थी मंडळ परिसरातून तिला अटक करण्यात आली.
हेही वाचा – मोसमी पावसाचा परतीच्या प्रवासाचा मुहूर्त यंदाही लांबणीवर
‘अबुझमाड’मध्ये महत्त्वाची बैठक
संजय यावर्षी मार्चमध्ये नक्षल्यांचा गड समजल्या जाणाऱ्या छत्तीसगडमधील अबुझमाड भागात जाणार होता. परंतु आजारी असल्याने तो काही काळ जंगलातून शहरी भागात वास्तव्यास होता. चार दिवसांपूर्वी तो अबुझमाड येथे जाण्यासाठी हैदराबाद येथे आला होता. येथे तो त्याच्या जुन्या मित्रांनादेखील भेटला. अबुझमाडमध्ये तो नक्षल्यांचा वरीष्ठ नेता बसवराज, गणपतीसह काही महत्वाच्या नेत्यांसोबत नव्या रणनीती संदर्भात चर्चा करणार होता. मागील वर्षी केंद्रीय समिती सदस्य मिलिंद तेलतुंबडे चकमकीत ठार झाल्याने त्याच्याकडे दंडकारण्य झोनची जबाबदारी देण्यात येणार होती. मात्र, त्याआधीच संजय पोलिसांचा जाळ्यात अडकला, अशी माहित पोलीस सूत्रांनी दिली आहे. संजयच्या अटकेने नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.