कधीकाळी नक्षलींचे ‘विश्रामस्थळ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा नक्षली सक्रिय झाल्याची शंका बळावली आहे. घाटंजी येथील गजानन लक्ष्मण ढवळे (रा. जगदंबा नगरी) यांना नक्षली कमांडरच्या नावे ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी पत्र आले आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. या पत्राने घाटंजी शहरात आणि पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
ढवळे यांना २ ऑगस्ट रोजी पोस्टाद्वारे लाल रंगाचा लिफाफा आला. त्यातील पत्र वाचून ढवळे यांना धक्काच बसला. या पत्रात, ‘मी गडचिरोली नक्षल दलम कमांडर क्र. ३८ असून, मला ५० लाख रुपये द्या, अन्यथा तुम्हाला जीवे मारू’, अशी धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी अखेर ४ ऑगस्टला घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हे पत्र हिंदी भाषेत लिहिले आहे. त्यात ‘ढवळे तुम्हाला लाल सलाम, तुम्ही मला ५० लाख रुपये द्या. याकडे कानाडोळा केल्यास आपल्या परिवारातील सदस्यांना जीवे मारु’, असे या पत्रात नमूद आहे. खंडणीची रक्कम १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता उमरी ते करंजी मार्गापासून तीन किलोमीटर अंतरावर हनुमान मंदिराजवळ असलेल्या दरगाहच्या मागे आणून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या पत्रामुळे ढवळे कुटुंबीय भयभीत आहे. हे पत्र कोठून आले, कोणी लिहिले याचा सुगावा अजूनही लागलेला नाही. ढवळे यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९९३ च्या सुमारास नक्षली विजयकुमार सक्रिय होता –
९० च्या दशकात यवतमाळ जिल्ह्यात नक्षली कारवाया सुरू होत्या. नक्षली मराठवाडा सीमेवरील किनवट, माहूरसह जिल्ह्यातील घाटंजी, झरी, मारेगाव, वणी आणि आर्णी हे तालुके विश्रामस्थळ म्हणून वापरत होते. घाटंजी परिसरात १९९३ च्या सुमारास नक्षली विजयकुमार सक्रिय होता. मात्र त्याचा खात्मा झाल्यानंतर या कारवाया थंड झाल्या. जिल्ह्यातील नक्षलप्रभावीत काही तालुक्यात शासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांना नक्षली भत्ताही सुरू केला होता.
सर्व खबरदारी घेऊन तपासाला गती – पोलीस अधीक्षक
खंडणीची पत्राबाबत पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांना विचारले असता, धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हे दाखल करून, नक्षल विरोधी सेलकडे अहवाल पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नक्षली कारवाया या पद्धतीने चालत नाही. हा प्रकार खोडसाळपणाचा वाटतो, तरीही पोलीस प्रशासनाने तपासाला गती दिली असून सर्व खबरदारी घेतली जात असल्याचे डॉ. भुजबळ म्हणाले.