गडचिरोली : छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात झालेल्या चकमकीत ठार झालेला नक्षल नेता जोगन्ना व इतर सहकाऱ्यांच्या स्मरणार्थ नक्षलवाद्यांनी ३० मे रोजी गडचिरोली बंदचे आवाहन केले आहे. यासंदर्भात नक्षल्यांच्या दांडकारण्य पश्चिम सबझोनल समितीचा प्रवक्ता श्रीनिवास याने नुकतेच एक पत्रक काढले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गडचिरोलीपासून १५ ते २० किलोमीटर अंतरावरील नारायणपूरच्या कांकेर सीमावर्ती भागात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला छत्तीसगड पोलीस व नक्षलवाद्यांत चकमक झाली होती. यात ठार झालेल्या दहा नक्षलवाद्यांत जहाल नक्षलवादी जोगन्ना, विनय, मलेश, सिंधू गावडे, सरिता जेट्टी आणि शिल्का यांचा समावेश होता. गडचिरोलीतील अनेक घातपाती कारवायांमध्ये या सर्वांचा प्रत्यक्ष सहभाग होता. जोगन्नावर गडचिरोलीत शंभरहून अधिक गुन्हे दाखल होते. मूळचा तेलंगणातील जयराम (जि. पेदापल्ली) येथे जोगन्नाचा जन्म झाला. बालवयात त्याचे वडील गेले, आईने दोन बहिणींची लग्ने केली. अस्पृश्यता, जातीवादाचे चटके सोसत जाेगन्ना लहानाचा मोठा झाला. भर तारुण्यात शेतकऱ्यांच्या न्याय-हक्काची भाषा करू लागला, पण या आंदोलनात शेतकरी नेत्याची हत्या झाली आणि सुडाने पेटलेल्या जोगन्नाने अत्याचार करणाऱ्या जमीनदाराची हत्या केली. सहा महिन्यांनी जामिनावर सुटल्यावर तो नक्षलचळवळीत सामील झाला. सुरुवातीला नरसय्या नावाने तो परिचित होता, पण नक्षलचळवळीत त्याला जोगन्ना हे नाव देण्यात आले, असे पत्रकात नमूद आहे.

हेही वाचा: गोंदिया : नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना शोधा अन् ११०० रूपये मिळवा, जिल्हा युवा सेनेचे….

सदस्य ते जहाल नक्षलवादी

मृत्यूसमयी जोगन्ना ६६ वर्षांचा होता. ३३ वर्षांत नक्षलचळवळीत सदस्य ते नेता असा प्रवास त्याने केला. एटापल्लीतून त्याने सदस्य म्हणून नक्षलचळवळीसाठी काम सुरु केले. गुरिल्ला दल उपकमांडर, कमांडर, विभागीय समिती अध्यक्ष, क्षेत्रीय कमेटी (रिजनल) सदस्य, संघटन व सैनिक मोर्चाचे नेतृत्वही त्याने केले. क्रांतिकारी जन कमेटीच्या एरियाअध्यक्षपदाची जबाबदारीही त्याने सांभाळली. एटापल्ली, धानोरा, अहेरी, चामोर्शी व कोरची या तालुक्यांत त्याचा अधिक वावर राहिला.

हेही वाचा: बुलढाणा : जिल्हा मुख्यालयातील बहुतेक फलक अवैध

नक्षलवाद्यांनी पत्रकातून ३० मे रोजी बंदचे आवाहन केले आहे. मात्र, जिल्ह्यात सुव्यवस्था अबाधित राखून हा बंद हाणून पाडण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे. नक्षल्यांच्या सर्व हालचालींवर कसून लक्ष आहे. त्यांचे मनसुबे कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत.

नीलोत्पल, पोलीस अधीक्षक
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxalites called gadchiroli bandh on 30th may to oppose the killing of naxal leader joganna ssp 89 css