गडचिरोली : मागील काही वर्षात पोलिसांनी केलेल्या कारवायांमुळे कथित नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या हिंसक कारवाया कमी झाल्या असून ही चळवळ संपण्याच्या मार्गावर आहे, अशी चर्चा सुरू असताना महिला आणि पुरुष नक्षलवादी ढोल, नगाड्याच्या तालावर नृत्य करीत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाली आहे.
गेल्या तीन दशकांपासून गडचिरोली जिल्हा नक्षल्यांच्या हिंसक कारवायांमुळे होरपळून निघत आहे. तेलंगण आणि छत्तीसगड सीमा लागून असल्याने या भागात ते कायम सक्रिय असतात. परंतु पोलिसांनी मागील काही वर्षांपासून राबविलेल्या आक्रमक नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षल चळवळ खिळखिळी झाली आहे. त्यामुळे हा परिसर आता नक्षलमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
अशात गुरुवारी महिला आणि पुरुष नक्षलवाद्यांचा ढोल, नगाड्याच्या तालावर नृत्य करतानाची चित्रफीत व्हायरल झाल्याने सुरक्षा यंत्रणेच्या भुवया उंचावल्या आहेत. ही चित्रफीत बस्तर भागातील असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे काही काळ शांत बसलेले नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र आहे.