गडचिरोली : सूरजागड यात्रेच्या पहिल्याच दिवशी हेडरीजवळ नक्षलींनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात कापडी फलक लावल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपासून दक्षिण गडचिरोली परिसरात नक्षलींच्या कारवाया बघता पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.
नुकतेच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी सूरजागड लोहप्रकल्पावरून आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना पत्रक काढून धमकी दिली होती. हा प्रश्न विधिमंडळात देखील उपस्थित झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी नक्षलींनी पुन्हा एकदा पत्रक काढून आत्राम यांच्यासह राजपरिवारावर बहिष्कार टाकण्याचे आव्हान केले होते. दरम्यानच्या काळात जिल्ह्याच्या दक्षिण भागात पोलीस-नक्षल चकमक उडाली. यात दोन नक्षली ठार झाले होते. गट्टा येथे नक्षलींनी बांधकामावरील साहित्यांची जाळपोळ केली होती.
हेही वाचा >>> अकोला : दरोडेखोरांनी चक्क एटीएम फोडले; १६ लाख ५४ हजारांची रोकड लंपास
आता पुन्हा त्यांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास हेडरी-सूरजागड मार्गावर लाल रंगाचे कापडी फलक लावून गोंडी भाषेत ‘दलाल धर्मराव आत्रामचा’ जनतेने भांडाफोड करावा, असे आव्हान केले आहे. यामुळे सूरजागड यात्रेवर नक्षलींचे सावट असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी अद्याप याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.